इचलकरंजी : येथील संग्राम चौक परिसरातील एका यंत्रमाग कारखान्यात कांडी मशीनमध्ये गळ्यातील स्कार्फ अडकून गळफास लागलेल्या महिला कामगाराचा मृत्यू झाला. शालन मारुती पवार (वय ६२, रा. बाळनगर) असे त्या महिलेचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. थंडीपासून बचावासाठीचा स्कार्फ जीवावर बेतला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे.याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, इस्माईल खानापुरे यांचा संग्राम चौक परिसरात यंत्रमाग कारखाना आहे. तेथे पोटमाळ्यावर कांडी मशीन आहे. त्यावर शालन या काम करीत होत्या. शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे काम करत असताना त्यांनी थंडीपासून बचावासाठी बांधलेला स्कार्फ कांडी मशीनमध्ये अडकला. त्यामुळे त्यांच्या गळ्याला फास लागून त्यांचा मृत्यू झाला. काही वेळानंतर कारखान्यातील कामगार पोटमाळ्यावरील मशीनच्या ठिकाणी गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी शालन यांना मशीनमधून सोडवून उपचारासाठी म्हणून इंदिरा गांधी रुग्णालयात नेले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. शालन यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.
Kolhapur: मशीनमध्ये स्कार्फ अडकून महिला ठार, इचलकरंजीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 13:54 IST