हद्दवाढीशिवाय कोल्हापूरला एक रुपयाचाही निधी नाही, अजित पवार यांनी प्रशासकांना सुनावले; पालकमंत्र्यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 12:14 IST2025-03-10T12:13:35+5:302025-03-10T12:14:06+5:30
कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निधी मागण्यासाठी कोल्हापूर महापालिका प्रशासक गेल्या होत्या. तिथे त्यांना पवार यांनी ...

हद्दवाढीशिवाय कोल्हापूरला एक रुपयाचाही निधी नाही, अजित पवार यांनी प्रशासकांना सुनावले; पालकमंत्र्यांनी दिली माहिती
कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निधी मागण्यासाठी कोल्हापूर महापालिका प्रशासक गेल्या होत्या. तिथे त्यांना पवार यांनी पुण्याची हद्दवाढ आतापर्यंत २७ वेळा झाली. कोल्हापूर का होत नाही, असे विचारून हद्दवाढीशिवाय एक रुपयांचाही निधी नाही, असे सुनावल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रविवारी दिली.
कोल्हापूर फर्स्ट या फोरमच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. खासदार शाहू छत्रपती अध्यक्षस्थानी होते. पॅव्हेलियन हॉटेलमधील मधुसूदन हॉलमध्ये कार्यक्रम झाला.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणे आवश्यक आहे; पण हद्दवाढ अनेक वर्षांपासून रंकाळा आणि कळंब्याच्या पुढे गेली नाही. हद्दवाढीला विरोध करणाऱ्या दोन आमदारांना आणि गावांना विश्वासात घेऊन हद्दवाढ व्हावी. हद्दवाढीत शहरालगतची उचगाव, पाचगाव, गोकुळ शिरगाव, अशी गावे प्राधान्याने घेतली पाहिजे.
चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री असताना ४१ गावांसह हद्दवाढीचा विषय पुढे आला. हा निर्णय अंतिम टप्प्यात असतानाही काही लोकप्रतिनिधींनी विरोध केला. यामुळे ४२ गावांचे प्राधिकरण तयार झाले. प्राधिकरणाच्या माध्यमातून गावांचा विकास होऊन शहरात ती गावे येण्यास अनुकूल होणे अपेक्षित होते; पण नुकतीच बैठक घेतली त्यावेळी अजून प्राधिकरणाची सुरुवातही झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे प्राधिकरणाचा विकास आराखडा तयार करून गावांचा विकास करण्यात येणार आहे.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, कोल्हापूरच्या विकासासाठी विमान, रेल्वेची सुविधा चांगली केली जात आहे. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेसाठीही पाठपुरावा सुरू आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्रात पाठपुरावा करीत आहे. मात्र, आता केवळ लोकप्रतिनिधींवर अवलंबून न राहता उद्योजकांनीही विकासासाठी पुढे यावे. शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ मेळावा घेऊन मी आणि राजेश क्षीरसागर यांनी भूमिका मांडली. राजकीय नेते म्हणून आम्हाला मर्यादा आहेत. म्हणून उद्योजकांनीही याच्या समर्थनार्थ उतरले पाहिजे.
आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, मित्र संस्थेच्या माध्यमातून कोल्हापूरचा विकास केला जात आहे. शक्तिपीठच्या माध्यमातून शहराचा विकास होणार आहे. हद्दवाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. आयटी पार्कसाठी १०० एकर जागा शेंडा पार्क येथे मिळविण्यात येईल.
यावेळी आमदार राहुल आवाडे, आमदार शिवाजी पाटील, आमदार अशोक माने, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे आदी उपस्थित होते. बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सर्जेराव खोत यांनी स्वागत केले. समन्वयक सुरेंद्र जैन यांनी प्रास्ताविक केले.
शहरातील रस्ते आनंदी आनंदच
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी रोज अनेक भाविक, पर्यटक शहरात येतात; पण शहरातील रस्ते आनंदी आनंदच आहेत, असा उपरोधिक टोला पालकमंत्री आबिटकर यांनी लगावला. बांधकाम, फायरचे परवाने लवकर मिळत नाहीत. विमानतळाचा विकास झाला पण स्टारच्या विमानाचे मुंबईचे दरही परवडतील असे पाहिजे, अशी अपेक्षाही आबिटकर यांनी व्यक्त केली.
कोल्हापूर विरोध करणारे, कृती समितीचे शहर
खासदार महाडिक म्हणाले, कोल्हापूर शहर विरोध करणारे, कृती समित्यांचे म्हणून बाहेर ओळखले जात आहे. मटणाचे दर वाढले म्हणून येथे आंदोलन झाले आहे. विरोध करणे, आंदोलन करणे जिवंतपणाचे लक्षण आहे; पण सरसकट सर्वच प्रकल्पांना विरोध केल्यास विकासाला खीळ बसल्याचा धोका आहे.
निमंत्रण पत्रिकेत नाव; पण प्रत्यक्षात गैरहजर
कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत नाव असलेले वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, आमदार सतेज पाटील, अमल महाडिक, चंद्रदीप नरके, राजेंद्र पाटील-यड्रावकर हे गैरहजर राहिले.