Kolhapur ZP President: मुश्रीफ यांचे सब कुछ कागल, जिल्ह्याचे आणखी एक सर्वोच्चपद कागलकडेच
By समीर देशपांडे | Updated: March 18, 2026 12:18 IST2026-03-18T12:15:15+5:302026-03-18T12:18:00+5:30
राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाला विरोध करणाऱ्या आमदार विनय कोरे यांच्याबाबत मुश्रीफ यांनी ‘गोकुळ’ डोळ्यासमोर ठेवून पुन्हा सबुरीचे धोरण स्वीकारले

Kolhapur ZP President: मुश्रीफ यांचे सब कुछ कागल, जिल्ह्याचे आणखी एक सर्वोच्चपद कागलकडेच
समीर देशपांडे
कोल्हापूर : गेले महिनाभर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून निर्माण झालेला संभ्रम भल्या सकाळी किल्ले पन्हाळ्यावर दूर झाला आणि कागल तालुक्यातीलच शिल्पा शशिकांत खोत अध्यक्ष झाल्या. आणखी एक जिल्ह्यातील सर्वोच्च पद याच तालुक्यातील कार्यकर्त्याच्या पत्नीला मिळाले. हसन मुश्रीफ यांच्यासारखा मातब्बर नेता आपल्या मतदारसंघाला आणि कार्यकर्त्याच्या पदरात भरभरून देण्यासाठी किती सजग असतो हेच या निवडीवरून सिद्ध झाले आहे. म्हणूनच मंगळवारी दिवसभर ‘सबकुछ कागल, कर दिया पागल’ ही टॅगलाईन सोशल मीडियावरून फिरत होती.
सध्या जिल्हा बँकेचे अध्यक्षपद, गोकुळचे अध्यक्षपद कागल तालुक्यात एकाच घरात आहे. स्वत: मुश्रीफ कॅबिनेट मंत्री आहेत. आता राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेले हे तिसरे पद कागल तालुक्यात गेले. जिल्हा परिषदेच्या इतिहासात भाजपला अध्यक्षपदानंतर आता उपाध्यक्षपदाचीही संधी मिळाली. जी अपेक्षेप्रमाणे आमदार अमल महाडिक यांच्या मतदारसंघातील त्यांचे खंदे समर्थक तानाजी पाटील यांनाच देण्यात आली.
जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर अध्यक्षपदासाठी जी नावे चर्चेत होती. त्यामध्ये शिल्पा खोत यांचे नाव अग्रहक्काने नव्हते. परंतु एक एक दिवस उलटत गेला आणि परिस्थितीत बदलत गेली आणि त्यांना संधी मिळाली.
वाचा: पन्हाळगडावर बंद पाकीट फोडलं, शिल्पाताईंचं भाग्य उजळलं
गडहिंग्लज तालुक्यातील गिजवण्याच्या शैलजा पाटील यांना हे पद मिळणार हे निश्चित होते. कारण गडहिंग्लजला अजून एकदाही अध्यक्षपद मिळालेले नाही. गिजवणे मतदारसंघ मुश्रीफ यांच्याच मतदारसंघात येतो. परंतु शैलजा यांचे पती, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील यांना कोणत्याही परिस्थितीत ‘गोकुळ’वर जायचे आहे. दोन पदे एकाच घरात देण्यास मुश्रीफ राजी नव्हते आणि शैलजा पाटील यांचे नाव मागे पडले.
कागल तालुक्यातील शोभाताई फराकटे यांचे नाव पहिल्यापासून चर्चेत होते. परंतु त्यांचे चिरंजीव मनोज फराकटे यांची काही महिन्यांपूर्वीच बिद्री साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याने त्यांचेही नाव मागे पडले. मुश्रीफ यांच्या विधानसभा मतदारसंघातील ही दोन नावे मागे पडल्यानंतर तिसरे नाव शिल्लक राहिले ते शिल्पा खोत यांचे.
शशिकांत खोत हे मुश्रीफ यांचे कट्टर समर्थक. अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी मुश्रीफ गटाची पडेल ती जबाबदारी यशस्वी करून दाखवलेली. अशातच शिल्पा खोत या दुसऱ्यांदा निवडून आलेल्या. या सगळ्याचा विचार करत मुश्रीफ यांनी अखेर खोत यांच्या पारड्यात आपले वजन वापरले आणि अध्यक्षांची ९२९२ क्रमांकाची गाडी कागल तालुक्यालाच देण्याचा निर्णय घेतला.
मतदारसंघाला प्राधान्य
पहिल्यापासून मुश्रीफ यांची मतदारसंघाला प्राधान्य अशीच भूमिका राहिलेली आहे. शाहूवाडी तालुक्यातील राजकुंवर गायकवाड यांना पद देऊन आमदार विनय कोरे यांच्याशी पुन्हा वैर वाढवण्याची मुश्रीफ यांची इच्छा नसावी. करवीर तालुक्यात पद देण्याचीही मागणी होती. तसेच सर्वाधिक राष्ट्रवादीचे सदस्य देणाऱ्या आजरा, गडहिंग्लज आणि चंदगड तालुक्यालाही पद देण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे एकाला देऊन दुसऱ्यांना नाराज करण्यापेक्षा मुश्रीफ यांनी कागल तालुक्यातच पद ठेवणे पसंद केले.
कोरेंशी जुळवून घेण्याचे संकेत
उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्यानंतर नविद मुश्रीफ आणि जनसुराज्यचे समित कदम यांनी हातात हात घेत तो उंचावून दाखवत मुश्रीफ, कोरे यांच्यात सलोखाच असल्याचे दाखवले. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाला विरोध करणाऱ्या आमदार विनय कोरे यांच्याबाबत मुश्रीफ यांनी ‘गोकुळ’ डोळ्यासमोर ठेवून पुन्हा सबुरीचे धोरण स्वीकारल्याचे यानिमित्ताने दिसून आले. मुश्रीफ-कोरे यांच्यात गेल्या चार दिवसांत मुंबईतही बैठक झाली व त्यामध्ये परस्परांतील समज-गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न झाला.