इचलकरंजीतील राष्ट्रवादी शरद पवारांसोबत, अशोक जांभळे-मदन कारंडे गटाचा संयुक्त निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 16:12 IST2023-07-04T16:10:26+5:302023-07-04T16:12:28+5:30
राष्ट्रवादी कार्यालयातून अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांचे पोस्टर हटविण्यात आले.

इचलकरंजीतील राष्ट्रवादी शरद पवारांसोबत, अशोक जांभळे-मदन कारंडे गटाचा संयुक्त निर्णय
अतुल आंबी
इचलकरंजी : स्वार्थासाठी काहीजणांनी राष्ट्रवादीतून फारकत घेतली असली तरी मूळ राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या विचारातून आम्ही पक्षाशी जोडले गेलो आहोत. त्यामुळे त्यांच्यासोबतच राहण्याचा संयुक्त निर्णय इचलकरंजी राष्ट्रवादीने घेतला आहे, अशी माहिती माजी आमदार अशोक जांभळे व प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यातील राजकीय घडामोडीनंतर कारंडे-जांभळे गट कोणता निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले होते. त्यावरच स्थानिक व राजकीय समीकरणे अवलंबून होती. त्याबद्दल त्यांनी एकत्र बैठक घेऊन निर्णय जाहीर केला.
जांभळे म्हणाले, बाप हा बाप असतो. शरद पवार यांनी नेहमी आम्हाला ताकद दिली. आता आम्ही त्यांच्या पाठीशी राहून त्यांना ताकद देणार आहे. कारंडे म्हणाले, ईडीची भीती घालून वेगळ्या पद्धतीचे राजकारण राज्यात सुरू आहे. याचे कार्यकर्त्यांना दु:ख आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार हसन मुश्रीफ नेते असले तरी मूळ पक्ष म्हणून आम्ही शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचे सांगितले.
तसेच आमच्यासोबत माजी आमदार राजीव आवळे, सर्व माजी नगरसेवक, तसेच शहरातील संपूर्ण राष्ट्रवादी एकसंघ असून, जयंत पाटील यांच्या माध्यमातून पक्षासोबत राहणार आहे. व शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी आज, बुधवारी मुंबई येथील पक्षाच्या बैठकीसाठी उपस्थित राहून पुढील निर्णय होईल, याप्रमाणे काम सुरू ठेवणार असल्याचे जाहीर केले. यावेळी नितीन जांभळे, अब्राहम आवळे, उदयसिंह पाटील, माधुरी चव्हाण, आदी उपस्थित होते.
शहरातील महाविकास आघाडी राहणार
शहरातील कॉँग्रेस-राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना यासह अन्य सर्व घटक पक्ष, गट यांना सोबत घेऊन सुरू केलेली महाविकास आघाडी ठरल्याप्रमाणे कार्यरत राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यालयातून पोस्टर हटविले
शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय झाल्यानंतर शहरातील राष्ट्रवादी कार्यालयातून अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांचे पोस्टर हटविण्यात आले.