कोल्हापूर हद्दवाढीसाठी पालकमंत्र्यांना कोणत्याही क्षणी घेराव घालणार, सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 18:03 IST2025-05-19T18:02:36+5:302025-05-19T18:03:30+5:30
‘गोकुळ’साठी वेळ मात्र हद्दवाढीसाठी वेळ नाही

कोल्हापूर हद्दवाढीसाठी पालकमंत्र्यांना कोणत्याही क्षणी घेराव घालणार, सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत जाहीर
कोल्हापूर : हद्दवाढप्रश्नी चर्चा करण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी वेळ द्यावा, बैठक घ्यावी, अशी मागणी कृती समितीतर्फे अनेकवेळा केली. त्यांना ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदासाठी आमदारांना एकत्र करण्यास वेळ आहे; पण शहर आणि जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या हद्दवाढ विषयात ते बैठक घेत नाहीत, असा आरोप सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्या पदाधिकऱ्यांनी रविवारी झालेल्या बैठकीत केला. याच प्रश्नी पालकमंत्री आबिटकर यांना कोणत्याही घेराव घालण्याचे आंदोलनही यावेळी जाहीर केले. महाराणा प्रताप चौकात बैठक झाली.
माजी महापौर आर.के.पोवार म्हणाले, वर्ष १९७२ पासून हद्दवाढीसाठी लढत आहोत. यापूर्वीचे सरकार आणि आताचे सरकार या विषयात फसवत आहे. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत महत्त्वाचे नेते, आमदार एकत्र येतात. तेच हद्दवाढीच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहेत. म्हणून हद्दवाढ झाल्याशिवाय महापालिकेची निवडणूक नको, अशी भूमिका घेऊ. पालकमंत्र्यांनी या विषयात वेळ दिलेली नाही. त्यांना घेराव घालून जाब विचारू.
बाबा पार्टे म्हणाले, शहराची हद्दवाढ होण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर हेच फक्त प्रयत्न करीत आहेत. शहराचे आमदार असल्याने त्यांचे ते कर्तव्यही आहे; पण ते यात एकाकी पडत आहेत.
आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक यांच्या भूमिका ‘व्हय बी म्हणत नाहीत आणि नाही बी म्हणत नाहीत’ अशी आहे. पालकमंत्री आबिटकर हे ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदासाठी आमदारांना एकत्र करून बैठका घेत आहेत; मात्र हद्दवाढीकडे ते दुर्लक्ष करीत आहेत. म्हणून त्यांना कोणत्याही क्षणी घेराव घालून जाब विचारू. हद्दवाढ केली नाही तर पालकमंत्रिपदाची खुर्ची फार दिवस राहणार नाही, असेही त्यांना सांगू.
सुशील भांदिगरे म्हणाले, हद्दवाढप्रश्नी नेते सोयीची भूमिका घेत आहेत. त्यामुळे शिवाजी पुलावर चक्काजाम करून उग्र आंदोलन छेडू. ‘आप’चे संदीप देसाई, राजू जाधव, अशोक भंडारे, अनिल कदम यांची भाषणे झाली. बैठकीस कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
आज खासदार यांच्यासोबत बैठक
हद्दवाढ विषयावर खासदार शाहू छत्रपती यांच्या उपस्थितीत आमदार नरके, आमदार सतेज पाटील, अमल महाडिक, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेऊ. याच्या नियोजनाच्या चर्चेसाठी आज, सोमवारी दुपारी १२ वाजता खासदार शाहू छत्रपती यांची सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होईल, असे पोवार यांनी सांगितले. बैठकीतच पोवार यांनी खासदार छत्रपती यांना मोबाइलवर संपर्क वेळ निश्चित केली.
राजारामपुरीपासून जागृतीला सुरुवात
ॲड. बाबा इंदूलकर म्हणाले की, हद्दवाढीसाठी आंदोलन उभारण्यासाठी शहरात व्यापकपणे जागृती होणे आवश्यक आहे. यासाठी आज, सोमवारी सायंकाळी सहा वाजता राजारामपुरी तालीम कट्यावर बैठक होईल. या बैठकीनंतर शहरातील सर्व भागांत जागृतीसाठी बैठका होतील. जोपर्यंत हद्दवाढ होत नाही, तोपर्यंत आंदोलन तेवत ठेवू.
..तर प्रवेश कर लावा
रोज शहरात ग्रामीणमधील लोक आणि करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. याचा ताण शहरावर येत आहे. शहराच्या विकासाला निधी कमी पडत आहे. हद्दवाढ झाली नसल्याने विकास निधी भरीव मिळालेला नाही. पुढील काळात हद्दवाढ होणारच नसेल निधीसाठी शहरात येणाऱ्यांना प्रवेश कर लावा, अशी मागणी शिंदेसेनेचे किशोर घाटगे, काँग्रेसचे संपतराव पाटील यांनी केली.