Kolhapur: महादेवीसाठी पुन्हा आंदोलन करणार - राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 18:54 IST2025-09-02T18:53:59+5:302025-09-02T18:54:25+5:30
मठातील सुरू असलेल्या कार्यक्रमास हत्तीण पाठवावी व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे.

Kolhapur: महादेवीसाठी पुन्हा आंदोलन करणार - राजू शेट्टी
जयसिंगपूर : राज्य सरकारकडून महादेवी हत्तीण नांदणी मठामध्ये परत करण्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल करूनही याबाबत प्रतिसाद मिळत नाही. याबाबत तातडीने निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला.
पेटा व वनविभागाला हाताशी धरून बेकायदेशीररीत्या हत्तिणीला वनतारा येथे घेऊन गेले आहेत. नांदणी मठामध्ये ६०० वर्षांपासून हत्ती पाळण्याची संस्कृती आहे. या हत्तींची चांगल्या पद्धतीने संगोपन केले जात असून, पेटासारख्या तथाकथित प्राणिमित्र संघटनांकडून चुकीचे कागदपत्रे व पुरावे तयार करून सर्व हत्ती वनतारा येथे सोडण्यात येत आहेत. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर पुनर्विचार याचिका दाखल केली.
गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री यांचेशी झालेल्या बोलण्याप्रमाणे सोमवारी सकाळी सरकारी वकील सिद्धार्थ धर्माधिकारी यांनी दुसऱ्यांदा न्यायालयासमोर अवगत करूनही हत्ती पूर्ववत नांदणी मठामध्ये स्थलांतरित करण्यासाठी गांभीर्याने घेतले जात नसल्याचे दिसून येत आहे.
नांदणी मठामध्ये चातुर्मास कार्यक्रम सुरू असून, कार्यक्रमामध्ये हत्तिणीचा मान असतो. यामुळे उच्चस्तरीय समितीने मठाच्या कार्यक्रमास हत्तीण घेऊन जाण्यास परवानगी दिली असून, तोच निर्णय उच्च व सर्वोच्च न्यायालयाने कायम केलेला आहे. यामुळे दिलेल्या निर्णयाप्रमाणे शासनाने पहिल्यांदा मठातील सुरू असलेल्या कार्यक्रमास हत्तीण पाठवावी व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे.