कोल्हापूर : कौटुंबिक वादातून पतीपासून विभक्त राहत असलेल्या पत्नीने पतीच्या कारमधील साडेआठ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग लंपास केली. हा प्रकार गुरुवारी (दि. ९) रात्री आठच्या सुमारास ताराबाई पार्कातील विठाई बनाई संकुलच्या पार्किंगमध्ये घडला. याबाबत फिर्यादीची पत्नी आणि मुलावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पत्नीला अटक केली.शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महंमद रावतार यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. व्यवसायातून आलेली रक्कम बॅगेत ठेवून ती बॅग कारमध्ये ठेवली होती. ९ जानेवारीला रात्री आठच्या सुमारास घरी गेल्यानंतर त्यांनी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये कार पार्क केली. त्यावेळी पत्नी खतिजा हिने बनावट चावीने कारचा दरवाजा उघडून रोकडची बॅग लंपास केली. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. पत्नीनेच रोकड लंपास केल्याचे लक्षात येताच महंमद यांनी पोलिसांत धाव घेतली.
याबाबत ट्रॅव्हल्स व्यावसायिक महंमद रफिक रावतार (वय ५२, रा. विठाई बनाई संकुल, ताराबाई पार्क) यांनी रविवारी (दि. १२) शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी फिर्यादीची पत्नी खतिजा रफिक रावतार (४७) आणि मुलगा राहील रफिक रावतार यांच्यावर गुन्हा दाखल झाला. खतिजा यांना पोलिसांनी अटक केली.
- कारची बनावट चावी वापरून लांबवलेली रक्कम ८ लाख ५० हजार.
- रावतार दाम्पत्यात वाद. दोघांच्या यापूर्वी एकमेकांच्या विरोधात तक्रारी. दोघेही सध्या विभक्त.
- महंमद यांच्याकडून पत्नीसह मुलावरही गुन्हा दाखल. पैशांची बॅग घेऊन जाताना दोघेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद.