Kolhapur: ट्रॅक्टरवरून खाली उतरताना पाय घसरला, गळ्यातील मफलरचा फास लागून चालकाचा मृत्यू झाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 16:08 IST2025-01-03T16:08:05+5:302025-01-03T16:08:29+5:30
उतरताना गळफास कसा बसेल याबाबत घटनास्थळावर संशय व्यक्त होत होता

संग्रहित छाया
मुरगूड : धामणे ते माध्याळ रस्त्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकाचा विचित्र अपघातात मृत्यू झाला. सुरेश रवी लोखंडे (वय २७, रा. संकेश्वर) असे त्या मृत चालकाचे नाव आहे. ट्रॅक्टरवरून खाली उतरताना पाय घसरून पडताना गळ्यातील मफलरने फास लागून या चालकाचा मृत्यू झाला. अपघाताची नोंद मुरगूड पोलिसात झाली आहे. या अपघाताची परिसरात मात्र जोरदार चर्चा सुरू आहे. खाली उतरताना गळफास कसा बसेल याबाबत घटनास्थळावर संशय व्यक्त होत होता.
अधिक माहिती अशी, धामणे ते माध्याळ रस्त्यावर माध्याळ गावाच्या हद्दीत सुरेश रवी लोखंडे हे ट्रॅक्टर घेऊन जात होते. चोथे खोपीच्या जवळ त्यांनी ट्रॅक्टर थांबवला. ते खाली उतरत असताना ट्रॅक्टरच्या बॅटरीसाठी जो लोखंडी बॉक्स होता त्याच्यावर पाय ठेवून खाली उतरत होते.त्यावेळी त्यांचा पाय घसरला आणि ते खाली पडले. याच वेळी त्यांच्या गळ्यात जो मफलर होता तो मडगार्डच्या पत्र्यात अडकला आणि त्या मफलरचा सुरेश यांच्या गळ्याला फास आवळला. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
संतोष आनंद जाधव यांनी मुरगूड पोलिस स्टेशनमध्ये वर्दी दिल्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास या घटनेची नोंद झाली. मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास सपोनि शिवाजीराव करे करत आहेत.