अहो आश्चर्यम्! खड्ड्याची अशीही कृपा; मृत्यूच्या दाढेतून कोल्हापुरातील आजोबा आले बाहेर, म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 18:00 IST2025-01-02T17:58:09+5:302025-01-02T18:00:24+5:30
तात्यांना भेटायला नागरिकांची रीघ लागली

अहो आश्चर्यम्! खड्ड्याची अशीही कृपा; मृत्यूच्या दाढेतून कोल्हापुरातील आजोबा आले बाहेर, म्हणाले..
रमेश पाटील
कसबा बावडा (कोल्हापूर): मी विठ्ठलाचा भक्त. पंढरीची वारी माझी कधीही चुकली नाही. विठ्ठलामुळेच माझा पुनर्जन्म झालाय. त्यामुळे संक्रांत अन् गोळ्यांचा कोर्स संपल्यानंतर डॉक्टरांना विचारून पंढरपूरला विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी जाणार. हे शब्द आहेत मृत घोषित केलेल्या पांडुरंग रामा उलपे उर्फ पांडू तात्या यांचे.
झाले असे की, पांडू तात्यांना पंधरा दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. त्यांना तात्काळ नातेवाईकांनी दवाखान्यात हलवले. पण उपचार सुरू असतानाच पांडू तात्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घरी अंत्यविधीची तयारी सुरू झाली, पै पाहुण्यांना निरोप देण्यात आले. पै पाव्हणे घरी जमू लागले. तात्यांना घरी घेवून जात असतानाच रस्त्यात ॲम्बुलन्स खड्ड्यात आदळली. या धक्क्याने तात्यांची काहीशी हालचाल सुरू झाली. ही गोष्ट लक्षात येताच त्यांना पुन्हा दवाखान्यात दाखल केले. तब्बल दोन आठवड्याच्या उपचारानंतर त्यांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला.
कसबा बाबड्यातील पांडू तात्या शेतमजूर म्हणून काम करतात. त्यांना एक मुलगी आहे. १९८० सालापासून ते वारकरी संप्रदायात आहेत. सर्वांशी मिळून मिसळून वागणारे पांडू तात्या नेहमीप्रमाणे घरी देवाची पूजा करत असतानाच त्यांना हृदय विकाराचा झटका आला. पत्नी बाळाबाई यांनी आरडाओरडा करत शेजाऱ्यांना हाका मारल्या. लगेचच त्यांना दवाखान्यात हलवण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र अखेर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
त्यानंतर काही वेळातच नातेवाईकांनी अंत्यविधीची तयारी सुरू केली. दरम्यान, तात्यांना ॲम्बुलन्समधून घरी आणताना त्यांची पुन्हा हालचाल सुरू झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल केले. पुन्हा उपचार सुरू झाले. तात्या उपचाराला प्रतिसाद देऊ लागले. सोमवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या तात्यांना भेटावयास त्यांच्या घरी रीघ लागली आहे. संक्रांत झाल्यानंतर लगेचच पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणार असल्याची तात्या सांगत होते.