मलिक यांच्यासाठी रस्त्यावर उतरणारे मंत्री कोठे आहेत?, समरजीत घाटगे यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 15:54 IST2022-02-28T15:53:52+5:302022-02-28T15:54:41+5:30
राजर्षी शाहू महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांना महाराजांच्या वंशाचा विसर पडला आहे.

मलिक यांच्यासाठी रस्त्यावर उतरणारे मंत्री कोठे आहेत?, समरजीत घाटगे यांचा सवाल
कोल्हापूर : दाऊदशी संबंध असलेले मंत्री नवाब मलिक यांच्यावरील कारवाई विरोधात रस्त्यावर उतरणारे महाविकास आघाडीचे मंत्री आता कोठे आहेत? असा सवाल भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी केला.
घाटगे यांनी रविवारी खासदार संभाजीराजे यांची आझाद मैदानात जाऊन भेट घेतली. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता, समरजीत घाटगे म्हणाले, राजर्षी शाहू महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांना महाराजांच्या वंशाचा विसर पडला आहे. समाजाने मागण्या तरी काय केल्या? मनात आणले तर पाच मिनिटांत त्यांची पूर्तता करता येऊ शकते.
मात्र, या सरकारला जाणीवपूर्वक ते करायचे नाही. दाऊदशी संबंध असलेल्या मंत्र्यासाठी पूर्ण मंत्रिमंडळ रस्त्यावर उतरते आणि खासदार संभाजीराजे गेले दोन दिवस उपोषणाला बसले असताना तिथे भेट द्यायला वेळ नाही, कोठे आहेत राष्ट्रवादीचे नेते? ही खरोखरच लाजीरवाणी गोष्ट आहे. राज्य सरकारच्या भूमिकेचा आपण निषेध करीत आहे. संभाजीराजे यांची प्रकृती खालावत आहे. सरकार दाद देणार नसेल तर आक्रोशाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही घाटगे यांनी दिला.