कोल्हापूर : आमदार विनय कोरे यांनी जनसुराज्य पक्षाचा महापौर करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाला ३५ लाख रुपये दिल्याची जाहीर कबुली दिली. कोरे यांच्या या कबुलीनंतर महापालिकेतील घोडेबाजार चव्हाट्यावर आला. हाच धागा पकडत पैसे घेतलेल्यांची नावे जाहीर करावीत, असे आवाहन भाकपच्या नेत्यांनी केले आहे.भाजप तर ईडीच्या इशाऱ्यावर चालतो. मग आता अनिल देशमुख, छगन भुजबळ यांच्याप्रमाणे कोरे यांच्यामागे ईडीची चौकशी लावणार का? असा सवालही भाकपचे नेते दिलीप पवार, सतीशचंद्र कांबळे यांनी केला.आमदार कोरे यांनी रविवारी (दि. १२) कोल्हापुरात झालेल्या बैठकीत महानगरपालिकेत पक्षाचा महापौर करण्यासाठी नगरसेवकांना पैसे दिले हे चुकलेच, अशी कबुली दिल्यानंतर त्याचे पडसाद उमटत आहेत. मंगळवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने याबाबत कोल्हापुरात पत्रकार बैठक घेत अनेक प्रश्न उपस्थित केले.यावेळी कांबळे म्हणाले, अशा प्रकारे कबुली देणे लोकशाहीच्या दृष्टीने गंभीर आहे. पैसे देणारा व घेणारा दोघेही दोषी आहेत. आता देणाऱ्याने कबुली दिली आहे, मग आता खरेच चूक झाली असे वाटत असेल तर ते पैसे घेणाऱ्यांची नावेही जनतेसमोर जाहीर करावीत.या पत्रकार बैठकीस अनिल चव्हाण, प्रशांत आंबी, दिलदार मुजावर, इर्शाद फरास, आरती रेडकर, नामदेव गावडे उपस्थित होते.
आमदार विनय कोरेंच्या मागे ईडीची चौकशी कधी लावणार?, भाकपचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2021 17:30 IST