बिहारसाठी कोल्हापुरातून दर रविवारी साप्ताहिक रेल्वे, उन्हाळी सुटीसाठी खास सोय; कधीपासून सुरु.. वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 15:50 IST2025-03-31T15:49:44+5:302025-03-31T15:50:11+5:30
कोल्हापूर : उन्हाळी सुटीत उत्तर भारतात जाण्यासाठी बिहारीबाबूंच्या सोयीसाठी मध्ये रेल्वेने कोल्हापूर -कटीहार विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू केली आहे. ...

बिहारसाठी कोल्हापुरातून दर रविवारी साप्ताहिक रेल्वे, उन्हाळी सुटीसाठी खास सोय; कधीपासून सुरु.. वाचा सविस्तर
कोल्हापूर : उन्हाळी सुटीत उत्तर भारतात जाण्यासाठी बिहारीबाबूंच्या सोयीसाठी मध्ये रेल्वेनेकोल्हापूर-कटीहार विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू केली आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील प्रवाशांना बिहारमध्ये जाण्यायेण्यासाठी कोल्हापूर ते कटीहार क्रमांक ०१४०५/०१४०६ ही साप्ताहिक विशेष रेल्वे दि. ६ एप्रिलपासून दर रविवारी सुरू होत आहे. या विशेष रेल्वेचा फायदा प्रवाशांनी घेण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
कोल्हापुरातील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्सवरून ६ एप्रिलपासून २७ एप्रिलपर्यंत ही उन्हाळी सुटीच्या कालावधीपुरती एक्स्प्रेस धावणार आहे. बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांना ही गाडी सोयीची ठरणार आहे. कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून ही विशेष साप्ताहिक रेल्वेसाठी सांगलीचाही थांबा आहे. यामुळे बिहारला जाणाऱ्या किंवा तिकडून येणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
बिहारी नागरिक विविध कामासाठी मोठ्या संख्येने पश्चिम महाराष्ट्रात वास्तव्य करीत आहेत. त्यांच्यासाठी बिहारच्या प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रेल्वे गाडीची मागणी गेल्या पन्नास वर्षांपासून होत आहे. या मागणीला प्रतिसाद देत अखेर मध्य रेल्वेने कोल्हापुरातून बिहारला जाणारी ही विशेष रेल्वे गाडी आता सुरू केली आहे. सध्या ही गाडी उन्हाळी विशेष साप्ताहिक रेल्वे म्हणून धावणार असून, या गाडीला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहून नंतर ही गाडी कायम होण्याची शक्यता आहे.
प्रत्येक रविवारी सुटणार
कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून ६ एप्रिलपासून गाडी क्र. ०१४०५ ही एक्स्प्रेस प्रत्येक रविवारी सकाळी ९:३५ वाजता बिहारमधील कटिहारकडे रवाना होणार आहे. कोल्हापुरातून ही गाडी तिसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी कटिहारला पोहोचेल.
असा असेल परतीचा प्रवास
कटिहार-सांगली-कोल्हापूर एक्स्प्रेस गाडी क्र. ०१४०६ ही गाडी ८ एप्रिलपासून २९ एप्रिलपर्यंत दर मंगळवारी परतीच्या प्रवास सुरू करेल. मंगळवारी सायंकाळी ६:१० वाजता कटिहार स्थानकावरून निघून ही गाडी गुरुवारी तिसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी कोल्हापूर रेल्वे स्थानकावर पोहोचेल.
असे असतील थांबे
मिरज, सांगली, कऱ्हाड, सातारा, पुणे, दौंड कॉर्ड केबिन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र (पटना), हाजीपूर, बरौनी, बेगुसराय, खगडिया आणि नौगचिया इथे थांबून मंगळवारी सकाळी ६:१० वाजता कटिहारला पोहोचेल.