कोल्हापुरात शाहू मिलमधील शाहू महाराजांचे स्मारक लवकरच पूर्ण करू, पालकमंत्री हसन मुश्रीफांचे आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 01:03 PM2024-02-05T13:03:36+5:302024-02-05T13:04:31+5:30

महासंस्कृती महोत्सवाची सांगता : वस्त्रोद्योगाकडे जागेसाठी पाठपुरावा करणार

We will soon complete Shahu Maharaj's memorial at Shahu Mill in Kolhapur, Guardian Minister Hasan Mushrif assurance | कोल्हापुरात शाहू मिलमधील शाहू महाराजांचे स्मारक लवकरच पूर्ण करू, पालकमंत्री हसन मुश्रीफांचे आश्वासन 

कोल्हापुरात शाहू मिलमधील शाहू महाराजांचे स्मारक लवकरच पूर्ण करू, पालकमंत्री हसन मुश्रीफांचे आश्वासन 

कोल्हापूर : श्री शाहू छत्रपती महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक कोल्हापुरातील शाहू मिल येथे येत्या काळात पूर्ण करू, यासाठी वस्त्रोद्योग विभागाकडे जागेसाठी पाठपुरावा करून लवकरच ती हस्तांतरित केली जाईल, असे आश्वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. कोल्हापूर जिल्ह्याला लाभलेली ऐतिहासिक, सांस्कृतिक परंपरा महासंस्कृती महोत्सवामधून सर्वदूर जाईल, असेही ते म्हणाले.

गेल्या पाच दिवसांपासून येथील शाहू मिल येथे सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सवाची सांगता रविवारी स्वराज्य-संस्थापक श्रीमंत योगी नाटकाने झाली. यावेळी ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांनी जनतेचं, रयतेचं राज्य राबवून समाजातील प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला; म्हणूनच आजही आपण त्यांच्या पालख्या अभिमानाने वाहतो. त्यांच्या पदपावन स्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक भूमीतील वारसा विविध सांस्कृतिक महोत्सवांतून पुढील पिढीकडे जायला हवा.’

जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, ‘अशा प्रकारच्या कार्यक्रमातून आपली परंपरा, आपली संस्कृती पुढील पिढीकडे जाते. असे कार्यक्रम पुन:पुन्हा राबविण्यासाठी राज्य शासन व जिल्हा प्रशासन भविष्यातही प्रयत्न करील.’ उपजिल्हाधिकारी संपत खिलारी यांनी आभार मानले.

यावेळी महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी नेमलेल्या अधिकारी, कर्मचारी, अशासकीय सदस्यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार स्वप्निल रावडे, प्रमोद पाटील, प्रसाद संकपाळ, ऋषिकेश केसकर, चंद्रकांत पाटील, शेखर वळीवडेकर, तेजस खैरमोडे, उदय गायकवाड, आदींचा समावेश होता. यावेळी महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त केशव जाधव, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मुश्रीफ यांनी दिली शस्त्र प्रदर्शनाला भेट

शाहू मिल येथील या महासंस्कृती महोत्सवातील ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शनाला पालकमंत्री मुश्रीफ यांनीही भेट दिली. याशिवाय कलाकार, कारागीर यांनी आपली संस्कृती, आपली हस्तकला आपल्या कलेतून सर्वांसमोर मांडली. गेले पाच दिवस शिवकालीन शस्त्र, हस्तकला, खाद्यसंस्कृती यांसह अनेक दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.

Web Title: We will soon complete Shahu Maharaj's memorial at Shahu Mill in Kolhapur, Guardian Minister Hasan Mushrif assurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.