कोल्हापूरच्या पारंपरिक वस्तू जगभरात नेण्यासाठी करार करू, 'प्राडा'च्या शिष्टमंडळाने दिली ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 13:18 IST2025-07-17T13:18:27+5:302025-07-17T13:18:48+5:30
जिल्हाधिकाऱ्यांशी केली चर्चा

कोल्हापूरच्या पारंपरिक वस्तू जगभरात नेण्यासाठी करार करू, 'प्राडा'च्या शिष्टमंडळाने दिली ग्वाही
कोल्हापूर : भविष्यात प्राडा कंपनीमार्फत येथील पारंपरिक वस्तू उत्पादन गुणवत्ता वाढवून आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी विविध पातळ्यांवर करार करण्याचा विचार केला जाईल. याबाबत कंपनीच्या बोर्ड मिटिंगमध्ये निर्णय झाल्यानंतर जिल्हा प्रशासनासह संबंधित बोर्ड ऑफ असोसिएशन तसेच उत्पादक कंपन्यांना कळविण्यात येईल, अशी ग्वाही कंपनीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिली.
इटलीच्या प्राडा कंपनीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासोबत कोल्हापुरी चप्पल आणि येथील पारंपरिक वस्तूंवर चर्चा केली. यावेळी कंपनीचे तांत्रिक आणि उत्पादन संचालक पाओलो टिव्हरॉन, पॅटर्न मेकिंग विभागाचे व्यवस्थापक डॅनिएल कोंटू, बाह्य सल्लागार आंद्रिया पोलास्ट्रेली आणि रॉबर्टो पोलास्ट्रेली तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग अधिकारी बालाजी बिराजदार, मेघ गांधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी येडगे यांनी चर्चेदरम्यान कोल्हापुरी चप्पलसंबंधी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची तसेच कोल्हापुरी साज, ठुशी आदी पारंपरिक वस्तूंची माहिती शिष्टमंडळाला दिली.
सांस्कृतिक वारसा
जिल्हाधिकारी येडगे म्हणाले,, ‘कोल्हापुरी चप्पल हा पारंपरिक भारतीय पादत्राणांचा प्रकार असून त्याचा इतिहास महाराष्ट्रातील कोल्हापूरशी जोडला आहे. कोल्हापुरी चप्पल ही केवळ पादत्राणे नसून, ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा एक भाग आहे. त्या स्थानिक कारागिरांच्या कौशल्याचे प्रतीक मानल्या जातात. कोल्हापूरशी या चपलांचे भावनिक नाते जोडले गेले आहे.’