शिरोळ : चळवळीमुळेच ऊस आणि दुधाला कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक दर मिळतो. शेतकऱ्यांचा अंकुश याला कारणीभूत असून दिल्ली येथे कृषी विधेयक कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला आणखी बळ देण्याची गरज आहे. त्यासाठी सोमवारी होणाऱ्या ट्रॅक्टर मोर्चातून केंद्र शासनाला महाराष्ट्राची ताकद दाखवूया, असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी केले.
शिरोळ येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना व युवा स्वाभिमानी संघटना यांच्या वतीने नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्र शासनाने शेतकऱ्यांवर लादलेल्या अन्यायी तीन कृषीविषयक धोरणाविरोधात माजी खासदार शेट्टी यांनी जनजागृती मेळाव्यात मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी वसंत पाटील-मलिकवाडे होते.
शेट्टी म्हणाले, नेतृत्वाविना दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. उद्योगपतींच्या फायद्यासाठी मोदी सरकारने कृषी विधेयक कायदे शेतकऱ्यांवर लादले आहेत. भविष्यात ऊसदराच्या कायद्यांकडे सरकार येईल, अशा पद्धतीने कायदे झाले तर शेतकरी संपणार आहेत. नगरसेवक प्रकाश गावडे यांनी स्वागत, तर पंचायत समितीचे उपसभापती सचिन शिंदे यांनी प्रास्ताविक केले.
मेळाव्यास स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, सावकर मादनाईक, राम शिंदे, जिल्हा परिषदेच्या सदस्या शुभांगी शिंदे, शैलेश चौगुले, राजगोंडा पाटील, सुवर्णा अपराज, अजित पवार, वैभव कांबळे, मन्सूर मुल्लाणी, राजेंद्र गड्यान्नावर, शैलेश आडके, शेखर पाटील, प्रा. राजाराम वरेकर, अमर माने यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते.
चौकट - हिंमत असेल तर विकासाला निधी द्या
सर्वसामान्य कार्यकर्ते ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेले आहेत. ते अडचणीत कसे येतील, असे धोरण सुरू आहे. सत्तेसाठी सदस्यांची पळवापळवी करू नका. हिंमत असेल तर उदगावमधील स्वाभिमानीचे नऊ सदस्य घ्या आणि गावाच्या विकासासाठी एक कोटी रुपये द्या, असा इशारा सावकर मादनाईक यांनी दिला.
फोटो - २३०१२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - शिरोळ येथे ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, सचिन शिंदे, सावकर मादनाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.