शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?, मंत्री मुश्रीफांनी स्पष्टच सांगितले; म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 14:25 IST2025-01-11T14:25:07+5:302025-01-11T14:25:58+5:30
कोल्हापूर : लाडक्या बहिणींचा डिसेंबरचा हप्ता जमा झाला असून, प्रसंगी विकासकामांना कात्री लावू पण त्यांना दिलेल्या वचनाप्रमाणे आगामी स्थानिक ...

शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?, मंत्री मुश्रीफांनी स्पष्टच सांगितले; म्हणाले..
कोल्हापूर : लाडक्या बहिणींचा डिसेंबरचा हप्ता जमा झाला असून, प्रसंगी विकासकामांना कात्री लावू पण त्यांना दिलेल्या वचनाप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी २१०० रुपयांप्रमाणे हप्ता देऊ, अशी ग्वाही देत शेतकऱ्यांना पाच वर्षांत कर्जमाफी देण्याचे वचन आमच्या जाहीरनाम्यात होते. त्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू, असेही वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले.
‘गोकुळ’तर्फे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी विधानसभेला लाडक्या बहिणी निर्णायक ठरल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर ‘अहो, येथे सतेज पाटील आहेत’, असे मंत्री मुश्रीफ यांनी निदर्शनास आणून दिले. आमदार सतेज पाटील म्हणाले, लाडक्या बहिणींना २१०० रुपयांचे दिलेले आश्वासन तेवढे पूर्ण करा. मी येथे बोलणार नव्हतो, पण अरुण डोंगळे यांनी विषय काढल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर मंत्री मुश्रीफ यांनीही जोरदार फटकेबाजी केली.
डेंटल कॉलेज कोल्हापुरात द्या
मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून राज्याचा सगळा आरोग्य विभाग कोल्हापुरात आला आहे. आयुर्वेदिकसह इतर तीन कॉलेज कागलला नेली आहेत, आता बॅकलॉग पूर्ण झाला आहे. यावर, डेंटल कॉलेज कागलला सुरू करणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगताच, डेंटल कॉलेज तेवढे कोल्हापुरात काढा, असे आमदार पाटील यांनी सांगितले.
डोंगळेंना विधान परिषदेचे वेध..
परदेश दाैऱ्यावर अध्यक्ष अरुण डोंगळे जाणार नाहीत, ते विधान परिषदेच्या प्रयत्नात असल्याने थांबल्याचे विश्वास पाटील यांच्याकडून समजल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. तर अध्यक्ष डोंगळे परदेशात जाणार नाहीत, याचे कोडे पडल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
महाराजांच्या सत्काराबद्दल ‘गोकुळ’चे आभार
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, खासदार शाहू छत्रपती यांचा सत्कार आयोजित केल्याबद्दल ‘गोकुळ’चे आभार मानतो. आम्ही महायुतीसोबत असल्याने त्यांच्याविरोधात काम केले होते, त्यामुळे उघड अभिनंदन करता आले नाही. तसे खासगीत केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याला विकासपथावर नेऊ.