पदवीधरसाठी भय्या मानेंची उमेदवारी आम्ही मेरीटवर मागतोय : मंत्री मुश्रीफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 18:35 IST2025-07-21T18:34:02+5:302025-07-21T18:35:26+5:30
विद्यमान आमदार अरुण लाड हे तुतारीकडे असले तरी..

पदवीधरसाठी भय्या मानेंची उमेदवारी आम्ही मेरीटवर मागतोय : मंत्री मुश्रीफ
कागल : गेली पंचवीस वर्षे भय्या माने पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका हाताळीत आहेत. सिनेट सदस्य म्हणून शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील जिल्ह्यांमध्ये ते परिचित आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी त्यांची उमेदवारी योग्य व अचूक आहे. म्हणून त्यांचे तिकीट आम्ही पक्षाकडे मेरीटवर मागत आहोत, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
जिल्हा बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भय्यासाहेब माने यांच्या संभाव्य उमेदवारीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पदवीधर मतदार नोंदणी अभियानाचा शुभारंभही करण्यात आला. यावेळी युवराज पाटील, ‘गोकुळ’चे अध्यक्ष नविद मुश्रीफ, बाजार समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील, सतीश पाटील, वसंतराव धुरे, चंद्रकांत गवळी, प्रकाश गाडेकर, आदी प्रमुख उपस्थित होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले की, जिल्ह्यात उच्चांकी मतदार नोंदणी करून उमेदवारीचा दावा प्रबळ करावा. आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार व पक्षातील वरिष्ठ नेत्यांना आग्रह करून भय्यांना उमेदवारी आणण्याची जबाबदारी माझी आहे. कारण पक्ष स्थापनेपासून आमच्या जिल्ह्यात विधानपरिषद मिळालेली नाही. भय्या माने म्हणाले, गतवेळीच मी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, क्रांतिअग्रणी जी.डी. बापूंच्या मुलासाठी म्हणून आपण माघार घेतली. विकास पाटील यांनी स्वागत केले. प्रवीण काळबर यांनी आभार मानले.
अरुण लाड अधून-मधून अजित पवार यांना भेटत असतात
गत निवडणुकीत विद्यमान आमदार अरुण लाड यांच्यासाठी भय्या मानेंनी घेतलेली मेहनत सर्वांना माहीत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ५२ टक्के मतदान झाले होते. म्हणून आता अरुण लाड व त्यांचे चिरंजीव शरद यांनी भय्यांना पाठिंबा द्यावा. आ. लाड हे तुतारीकडे असले तरी अधून-मधून ते अजित पवार यांना भेटत असतात, असेही मंत्री मुश्रीफ म्हणाले.