खासगी रुग्णालयात ‘रेफर’करण्यासाठी आपण नाही; आरोग्य मंत्र्यांनी शासकीय डॉक्टरांची केली कानउघाडणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 17:55 IST2025-11-18T17:54:26+5:302025-11-18T17:55:08+5:30
'तुमच्यासाठी शासन जे-जे शक्य आहे ते करण्यासाठी प्रयत्नशील आहे, परंतु तुम्ही जनतेसाठी संपूर्ण योगदान द्या'

खासगी रुग्णालयात ‘रेफर’करण्यासाठी आपण नाही; आरोग्य मंत्र्यांनी शासकीय डॉक्टरांची केली कानउघाडणी
कोल्हापूर : खासगी रुग्णालयात रुग्ण रेफर करण्यासाठी आपण नाही आहोत. आपल्या दवाखान्यात रुग्ण येत नाहीत, आले तर थांबत नाहीत, हे डॉक्टर म्हणून आपले अपयश आहे, अशा स्पष्ट शब्दांत सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कामचुकार शासकीय डॉक्टरांची सोमवारी कानउघाडणी केली.
येथील शासकीय विश्रामगृहावरील शाहू सभागृहात आयोजित शासकीय डॉक्टरांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजनेबाबत ही कार्यशाळा घेण्यात आली.
मंत्री आबिटकर म्हणाले, तुमच्यासाठी शासन जे-जे शक्य आहे ते करण्यासाठी प्रयत्नशील आहे, परंतु तुम्ही जनतेसाठी संपूर्ण योगदान द्या. आणखी तीन महिन्यांनंतर मी परत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचा आढावा घेणार आहे. तामिळनाडूमध्ये दोन्ही आरोग्य योजनांमधील खर्च निधीच्या ६० टक्के निधी शासकीय रुग्णालयांनाच परत मिळतो. कारण, अधिकाधिक रुग्ण शासकीय रुग्णालयातच उपचार घेतात. महाराष्ट्रात मात्र हे प्रमाण केवळ १२ टक्क्यांवर आहे. तुम्ही जर नागरिकांमध्ये तुमच्याबद्दलचा विश्वास निर्माण केलात, तर हे आपल्यालाही अशक्य नाही.
दिवसभरात उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा कुष्ठरोग अधिकारी डॉ. हेमलता पालेकर, डॉ. उत्तम मदने, डॉ. प्रकाश पावरा यांनी मार्गदर्शन केले.
२८ आजारांवर उपचार
महात्मा फुले योजनेतून शासनाने आता १२०० आजारांमध्ये वाढ करून ती संख्या २३०० पर्यंत नेली आहे. यातील २८ प्रकारच्या आजारांवर या योजनेतून प्राथमिक आरोग्य केंद्रातच उपचार व्हावेत, यासाठीही निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार डॉक्टरांनी याची अंमलबजावणी सुरू करावी, असे आवाहनही मंत्री आबिटकर यांनी यावेळी केले.