नृसिंहवाडी : गेल्या चोवीस तासात कृष्णा व पंचगंगा नदीच्यापाणी पातळीत १० फुटाने वाढ झाल्याने दत्त मंदिरातपाणी आले. त्यामुळे यंदा चौथा दक्षिणद्वार सोहळा सकाळी नऊ वाजता संपन्न झाला. सकाळची वेळ, एकादशीमुळे भाविकांनी दर्शनासाठी व स्नानासाठी गर्दी केली होती.उसंत घेतलेल्या पावसाने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा दमदार हजेरी लावल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. आज सकाळी नऊ वाजता चालू सालातील चौथा दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. भाविकांनी दिगंबरा दिगंबराच्या व श्री गुरुदेव दत्तच्या गजरात दक्षिणद्वार सोहळ्यात स्नानाचा लाभ घेतला. भाविकांची गर्दी लक्षात घेता श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थान मार्फत जादा सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे. दरम्यान श्रींची उत्सव मूर्ती दर्शनासाठी प. प. श्री नारायण स्वामी यांचे मंदिरात ठेवण्यात आली आहे. दक्षिणद्वार सोहळा योगायोगच श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर पूर्वाभिमुख असून उत्तर बाजूने येणारा कृष्णा नदीचा प्रवाह येथील दत्त चरणांना स्पर्श करून दक्षिणद्वारातून बाहेर पडतो या सोहळ्याला दक्षिणद्वार सोहळा म्हणतात. श्री चरणावरून येणाऱ्या कृष्णा प्रवाहात स्नान केल्याने पुण्याची प्राप्ती होते अशी भाविकांची श्रद्धा असल्याने भाविक स्नान व दर्शनासाठी गर्दी करतात. हा सोहळा पाणी वाढताना व उतरताना असा दोन वेळा होतो.
Kolhapur: नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात पाचव्यांदा पाणी, दक्षिणद्वार सोहळ्यात स्नानासाठी भाविकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 13:42 IST