झुडपे अडकल्यामुळे वारणेच्या पुराच्या पाण्याचा मार्ग बदलला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 19:08 IST2019-10-22T19:07:33+5:302019-10-22T19:08:33+5:30
सलग तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर-सांगली जिल्ह्याची सरहद्द बनलेल्या वारणा नदीच्या पुराची पातळी वाढली आहे.

झुडपे अडकल्यामुळे वारणेच्या पुराच्या पाण्याचा मार्ग बदलला
दिलीप चरणे
नवे पारगाव - सलग तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर-सांगली जिल्ह्याची सरहद्द बनलेल्या वारणा नदीच्या पुराची पातळी वाढली आहे. पावसाने झोडपून काढल्यामुळे नदीपात्रात अर्ध्या उंचीएवढे असणारी पाण्याची पातळी पात्र भरून वाहू लागली आहे.वारणा नदीवर वारणानगर - चिकुर्डे मार्गावर वारणा नदीवर पूर्वीचा धरण पूल आहे. पूर्वी याच धरण पुलावरून वारणानगर ते चिकुर्डे दरम्यान वाहतूक सुरू होती. अलीकडच्या काही वर्षांपूर्वी नवीन उंच पूल झाला.या मोठ्या पुलाजवळच हा धरण पूल आहे. या धरण पुलात बेटाची झुडपे अडकल्यामुळे वारणेच्या पुराच्या पाण्याचा मार्ग बदलला आहे.
मुसळधार पावसामुळे पाण्याच्या प्रवाहात दोन दिवस मोठी वाढ होत आहे. पाण्याच्या लोंढ्यामुळे वारणेच्या काठावर असणारी बेटांची झुडपे तुटून मुख्य प्रवाहात आली आहेत. बेटांच्या झुडपांचा तुंबा चिकुर्डे धरण पुलाच्या खाली असणाऱ्या पिलर्समध्ये अडकला आहे. त्यामुळे धरण पुलाजवळ नदीच्या पाण्याने मार्गच बदलला आहे. नदीच्या किनार्यावरील दोन्ही काठ तोडून पुराचे पाणी ओसंडून वाहत आहे.
पाऊस असाच सुरू राहिला तर पुराच्या पाण्याची वाढ होऊन दोन्ही काठावरची शेती तुटुन जाण्याची भीती नदीच्या काठावरील शेतकर्यांना वाटत आहे.पाटबंधारे विभागाने चिकुर्डे धरण पुलात अडकलेली बेटांची झुडपे ताबडतोब हटवण्याची मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील पारगाव, कोडोली व सांगली जिल्ह्यातील चिकुर्डे गावच्या नागरिकांनी केली आहे.