Kolhapur Municipal Election 2026: दहा वर्षांनंतर होणार निवडणूक, उमेदवारांसह नेत्यांनीही सोडला सुटकेचा नि:श्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 13:23 IST2025-12-16T13:19:36+5:302025-12-16T13:23:18+5:30
प्रभाग रचना बदल्यामुळे नेत्यांची कोंडी

Kolhapur Municipal Election 2026: दहा वर्षांनंतर होणार निवडणूक, उमेदवारांसह नेत्यांनीही सोडला सुटकेचा नि:श्वास
कोल्हापूर : राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला अन् तब्बल दहा वर्षांनंतर कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदान करण्याची संधी मिळत असल्याचा आनंद मतदारांमध्ये पाहायला मिळाला. होणार होणार म्हणत तीनवेळा हुलकावणी दिलेली निवडणूक अंतिमत: होणार असल्याने इच्छुक उमेदवारांसह नेत्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे. गेल्या वर्षभरापासून प्रभागांमध्ये तयारी करत ' हात 'सैल' सोडलेल्या इच्छुकांनी निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर आनंदोत्सव साजरा केला आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या १५ नोंव्हेंबर २०१५ ला झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांची मुदत नोंव्हेंबर २०२० मध्ये संपली. मात्र, कोराेना, ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या.
प्रत्येकवेळी इच्छुकांच्या तयारीवर पाणी
कोल्हापूर महानगरपालिकेच्या इतिहासात यापूर्वी एकसदस्यीय प्रभाग होते. २०१५ मध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत एक सदस्यीय प्रभाग निवडणूक झाली. २०२० मध्ये महानगरपालिकेची मुदत संपली. त्यानंतर आलेली कोरोना लाट आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणूक झाली नाही. परिणामी, महानगरपालिकेचा गाडा प्रशासकांच्या हातात गेला. २०२० नंतर महानगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया तीन वेळा राबवण्यात आली. पहिल्यांदा एक सदस्यीय प्रभाग रचना झाली. त्यानंतर तीन सदस्यीय प्रभाग रचना दोनवेळा राबविण्यात आली होती. मात्र, प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या कारणाने निवडणूक लांबणीवर पडत गेल्याने इच्छुकांच्या तयारीवर पाणी फेरले गेले.
वाचा : बिगुल वाजला.. उमेदवारांनी शड्डू ठोकला; जागावाटपासाठी महायुती त्रिसदस्यीय समिती नेमणार
प्रभाग रचना बदल्यामुळे नेत्यांची कोंडी
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रथमच चार सदस्यीय प्रभाग रचना असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा कस लागणार आहे. एका एका प्रभागात एका पक्षाकडून डझनभरापेक्षा जास्त इच्छुक असल्याने उमेदवारी कुणाला द्यायची, असा पेच नेत्यांना पडला आहे. त्यात बंडखोरी होण्याची भीती असल्याने सर्वच पक्षांनी अद्यापही उमेदवारांची नावे निश्चित केलेली नाहीत.
दृष्टिक्षेपात निवडणूक
- एकूण प्रभाग-२०
- एकूण जागा-८१
- एकूण मतदार - ४ लाख ९४ हजार ७११
- पुरुष : २ लाख ४४ हजार ७३४
- स्त्री : २ लाख ४९ हजार ९४०
२०१५ मध्ये पाच वर्षात ८ महापौर
- अश्विनी रामाणे (काँग्रेस)
- हसिना फरास (राष्ट्रवादी काँग्रेस)
- स्वाती यवलुजे (काँग्रेस)
- शोभा बोंद्रे (काँग्रेस)
- माधवी गवंडी (राष्ट्रवादी काँग्रेस)
- सरिता मोरे (राष्ट्रवादी काँग्रेस)
- सूरमंजिरी लाटकर (राष्ट्रवादी काँग्रेस)
- नीलोफर आजरेकर (काँग्रेस-अपक्ष)