कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या १२८ रिक्त जागांसाठी २८ एप्रिलला मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 12:28 IST2026-03-21T12:27:57+5:302026-03-21T12:28:35+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील १०० ग्रामपंचायतींमधील १२८ रिक्त पदांसाठी २८ एप्रिल रोजी मतदान हाेत आहे. यामध्ये ३९ जागा या थेट ...

कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या १२८ रिक्त जागांसाठी २८ एप्रिलला मतदान
कोल्हापूर : जिल्ह्यातील १०० ग्रामपंचायतींमधील १२८ रिक्त पदांसाठी २८ एप्रिल रोजी मतदान हाेत आहे. यामध्ये ३९ जागा या थेट सरपंच पदाच्या, तर ८९ जागा या सदस्य पदांसाठीच्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने या ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
राज्यातील ग्रामपंचायतींमधील सदस्य, थेट सरपंच यांचे निधन, राजीनामा, अपात्रता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये राज्यातील २ हजार ४४४ ग्रामपंचायतींमधील ४७१ जागा थेट सरपंचपदाच्या व ३ हजार १२० जागा सदस्य पदाच्या रिक्त आहेत. यामध्ये कोल्हापुरातील एकूण १२८ पदांचा समावेश आहे. या सर्व ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया ३० मार्चपासून सुरू होत असून, त्यादिवशी अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल.
निवडणूक कार्यक्रम असा
- नोटीस प्रसिद्धी : ३० मार्च
- उमेदवारी अर्ज दाखल करणे ७ एप्रिल ते १३ एप्रिल
- छाननी : १५ एप्रिल
- माघार व अंतिम उमेदवार यादी प्रसिद्धी : १७ एप्रिल
- मतदान : २८ एप्रिल (सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच)
- मतमोजणी : २९ एप्रिल
- निकालाची अधिसूचना प्रसिद्धी : ६ मे