Kolhapur: सामाजिक सलोख्याचा संदेश जपण्यासाठी विशाळगडास भेट - सुजात आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 13:29 IST2025-01-13T13:29:02+5:302025-01-13T13:29:34+5:30

गजापूर येथील मशिदीजवळ पोलिस कुमक

Visit to Vishalgad to preserve the message of social harmony says Sujat Ambedkar | Kolhapur: सामाजिक सलोख्याचा संदेश जपण्यासाठी विशाळगडास भेट - सुजात आंबेडकर

Kolhapur: सामाजिक सलोख्याचा संदेश जपण्यासाठी विशाळगडास भेट - सुजात आंबेडकर

आंबा : राजकीय पोळी भाजण्यासाठी शिवरायांचा चुकीचा इतिहास सांगून दोन जातींमध्ये तेढ वाढवण्याचा प्रयत्न होत आहे. अनाजी पंताची प्रवृत्ती जपलेल्यांनी आम्हाला शिवाजी महाराज शिकवू नये. सामाजिक सलोख्याचा संदेश जपण्यासाठी विशाळगडला भेट दिल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख सुजात आंबेडकर यांनी स्पष्ट केले. विशाळगड येथील भेटीवेळी आंबेडकर यांनी ग्रामस्थ व प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

रविवारी विशाळगडावरील मलिक रेहानबाबा उरूसाचा पहिला दिवस होता. यानिमित्त सुजात आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांसह दर्गामध्ये भेट देऊन दर्शन घेतले. दर्गासह गडपरिसराची त्यांनी पाहणी केली. दुपारी अडीच वाजता ते गडावर पोहचले होते. विशाळगड आणि गजापूर, बौद्धवाडी येथे त्यांचे स्वागत करण्यात आले.

शाहूवाडीचे पोलिस निरीक्षक विजयकुमार घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली गजापूर परिसरात ७० पोलिस व ६ अधिकारी तैनात होते. गजापूर येथील मशिदीजवळ पोलिस कुमक होती. उरूसाच्या पहिल्या दिवशी सुमारे १३६५ भाविक व पर्यटकांनी दहा ते पाच या वेळेत भेट दिली. पाच नंतरही भाविक गडाकडे येत होते, पण त्यांना पोलिसांनी माघारी पाठवले. सायंकाळी पाच नंतर पोलिसांनी गड परिसरात गस्त घालून सर्वांना गडाखाली पाठवले.

दरम्यान मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर व भारत भाई पाटील यांनीही दुपारी भेट देऊन दोन्ही समाजातील लोकांना सलोखा कायम राखण्याचे आवाहन केले. नारकर म्हणाले, उरूसास बंदी घालण्याचे कोणतेही समर्थनीय कारण नाही. प्रशासनाने घातलेली बंदी अनाकलनीय आहे.

उरूसास प्रशासनाने नाकारले असले, तरी आज परंपरेनुसार भाविकांनी हजेरी लावून देवदर्शन घेतले. मुक्कामास बंदी असल्याने गडावरील दोनशेवरील निवासगृहे कुलूपबंद होती.

सलोखा राखलाच पाहिजे

शिवरांच्या सैन्यात अठरा पगड जातीचे मावळे होते. मुस्लीम सैनिकही स्वराज्याच्या कार्यात होते. स्वराज्य सर्वधर्म सहिष्णूतेवर आधारलेले होते, त्याचे प्रतिक विशाळगड आहे. दोन्ही धर्मियांचे लोक येथे सलोख्याने पिढ्यान् पिढ्या राहतात. समाजातील सलोखा कायम राखला पाहिजे, असा विश्वास सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केला. विशाळगडावरील जनजीवन पूर्ववत होत असून, पर्यटकांमुळे स्थानिकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: Visit to Vishalgad to preserve the message of social harmony says Sujat Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.