ट्रकमधील उसावर बसून विश्वास पाटील आले होते खांडेकरांचा सत्कार पाहायला, कोल्हापूरच्या आठवणी

By समीर देशपांडे | Updated: September 15, 2025 12:02 IST2025-09-15T12:01:40+5:302025-09-15T12:02:02+5:30

शाहूवाडीचे सुपुत्र, महापालिकेनेही केला होता सत्कार

Vishwas Patil, the Panipatkar who was elected as the president of the 99th Marathi Sahitya Sammelan had come riding on a sugarcane in a truck to Kolhapur to witness the felicitation of V S Khandekar | ट्रकमधील उसावर बसून विश्वास पाटील आले होते खांडेकरांचा सत्कार पाहायला, कोल्हापूरच्या आठवणी

ट्रकमधील उसावर बसून विश्वास पाटील आले होते खांडेकरांचा सत्कार पाहायला, कोल्हापूरच्या आठवणी

समीर देशपांडे

कोल्हापूर : मराठी साहित्यामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारे ‘पानिपतकार’ विश्वास पाटील हे सहावी, सातवीत असताना ज्ञानपीठ विजेत्या वि. स. खांडेकर यांच्या खासबागेतील सत्कारासाठी बांबवड्यापर्यंत चालत आणि नंतर कोल्हापूरला येणाऱ्या ट्रकमधील उसावर बसून आले होते. त्यांच्या अभिनंदनासाठी फोन केल्यानंतर त्यांनीच ही लहानपणची आठवण सांगितली आणि तो सत्कारही प्रेरणादायी ठरल्याचे सांगितले.

शाहूवाडी तालुक्यातील नेरले गावच्या या सुपुत्राची सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड जाहीर झाली आणि त्यांच्या कोल्हापुरातील आठवणीही चर्चेत येऊ लागल्या आहेत. सातवीपर्यंत गावातच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण. त्यानंतर पुढचे शिक्षण शिराळा तालुक्यातील कोकरूड येथे घेतले. येथील न्यू कॉलेजमधून त्यांनी इंग्रजीची पदवी घेतली. प्राचार्य रा. कृ. कणबरकर त्यांना अध्यापनासाठी होते. त्यानंतर शिवाजी विद्यापीठातून त्यांनी एमएची पदवी संपादन केली. त्यावेळी प्रसिद्ध कन्नड लेखक डॉ. शांतीनाथ देसाई हे इंग्रजी विभागाचे प्रमुख होते.

त्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत गेलेल्या पाटील यांनी सातारा येथून वकिलीचीही पदवी घेतली. सांगली जिल्ह्यात कार्यरत असताना त्यांनी धरणग्रस्तांच्या वेदना अनुभवल्या आणि त्यांच्या ‘झाडाझडती’ कादंबरीद्वारे मांडल्या. या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर उदय कुलकर्णी आणि रूपा शहा यांच्या पुढाकाराने त्यावेळी पाटील यांचा कोल्हापूर महापालिकेतर्फे सत्कारही करण्यात आला होता. जिल्ह्यातील मूळचे आजऱ्यातील असलेले मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांच्याशीही त्यांचा विशेष स्नेह होता. साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर शिवाजीदादा खूष झाले होते अशी आठवणही पाटील यांनी सांगितली आहे.

माजी विद्यार्थी मेळाव्याला उपस्थिती

न्यू कॉलेजच्या वतीने चार वर्षांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या माजी विद्यार्थी मेळाव्याला विश्वास पाटील आले होते. त्यावेळी बराच वेळ थांबून त्यांनी मनाेगतामध्ये सविस्तर आठवणी सांगून महाविद्यालयाला देणगीही दिली होती असे सांगण्यात आले.

ज्ञानेश्वर मुळे आणि पाटील यांचा एकत्र अभ्यास

विश्वास पाटील यांनी आपल्या एका जुन्या फेसबुक पोस्टमध्ये आठवणी लिहिली आहे की, ते आणि ज्ञानेश्वर मुळे दोघे मिळून मुंबईतील डॉ. प्रमिला जरग यांच्या नायगावमधील फ्लॅटवर एकत्र अभ्यास करत होतो. आम्ही दोघेही कोल्हापूर जिल्हा परिषदेचे प्रॉडक्ट आहोत.

Web Title: Vishwas Patil, the Panipatkar who was elected as the president of the 99th Marathi Sahitya Sammelan had come riding on a sugarcane in a truck to Kolhapur to witness the felicitation of V S Khandekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.