शिवप्रेमी विनोद शेळके यांची डोणोली ते रायगड सायकल भ्रमंती, सलग दोन वर्षे राबवतात हा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 13:51 IST2023-06-05T13:34:41+5:302023-06-05T13:51:10+5:30
मोलमजुरी व कूकचा व्यवसाय करून चालवतो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह

शिवप्रेमी विनोद शेळके यांची डोणोली ते रायगड सायकल भ्रमंती, सलग दोन वर्षे राबवतात हा उपक्रम
आर. डी. पाटील
बांबवडे : डोणोली (ता. शाहूवाडी) येथील विनोद शेळके हा शिवप्रेमी डोणोली ते रायगड सायकल प्रवास करून राज्याभिषेक दिनास उपस्थित राहणार असून सलग दोन वर्षे तो हा उपक्रम राबवत आहे.
विनोद हा पंचक्रोशीत ‘रॉकर’ नावाने ओळखला जातो. मोलमजुरी व कूकचा व्यवसाय करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो.
गेल्या वर्षीही त्याने रायगडपर्यंत सायकल भ्रमंती करत राज्याभिषेक दिनास हजेरी लावली होती. याहीवर्षी विनोदने २ जूनला शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून रायगडसाठी प्रयाण केले. बांबवडे, कोकरूड, कराड, सातारा, माढा, पुणेमार्गे पाच जून रोजी संध्याकाळपर्यंत तो रायगडवर पोहोचणार आहे.
मार्गात एखादी आश्रमशाळा किंवा बसस्थानकाचा आसरा घेत, बरोबर असलेली शिदोरी खाऊन ऊन, वारा, पाऊस, झेलत खडतरपणे मार्गक्रमण करून विनोद राज्याभिषेक दिनास हजेरी लावणार आहे.
आई जगदंबा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने अंगामध्ये जोपर्यंत बळ आहे, तोपर्यंत कोणाच्याही मदतीची अपेक्षा न ठेवता, दरवर्षी सायकलवरूनच राज्याभिषेक दिनाच्या सोहळ्यास उपस्थिती लावणार आहे. - विनोद शेळके डोणोलीकर