प्राणी गणना: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात १५ वेगवेगळ्या वन्य प्रजातींच्या प्राण्यांचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 16:19 IST2022-05-20T16:13:57+5:302022-05-20T16:19:36+5:30
यावर्षी निसर्ग व वन्यजीव प्रेमींना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलातील पाणवठ्यावरील प्राण्यांची गणना करण्याची संधी मिळाली

प्राणी गणना: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात १५ वेगवेगळ्या वन्य प्रजातींच्या प्राण्यांचे दर्शन
अनिल पाटील
सरुड : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पोर्णिमेदिवशी रात्रीच्या वेळी झालेल्या पाणवठ्यावरील प्राणी गणनेत १५ वेगवेगळ्या वन्य प्रजातीच्या प्राण्यांचे दर्शन झाले आहे. या प्राणी गणने दरम्यान ३०८ प्राणी आढळल्याची नोंद झाली आहे. यामध्ये बिबटे, साळिंदर, हनुमान वानर, गवा, रानडुक्कर, अस्वल, भेकर, ससा, रानकुत्रे आदी वन्य प्राण्यांचा समावेश आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात चांदोली राष्ट्रीय उद्यान व कोयना अभयारण्याचा समावेश आहे.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षे प्राणी गणना करता आली नाही. परंतू यावर्षी मात्र निसर्ग व वन्यजीव प्रेमींना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलातील पाणवठ्यावरील प्राण्यांची गणना करण्याची संधी मिळाली. या व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव विभागाच्या वतीने बुद्ध पोर्णिमेच्या रात्री चांदण्याच्या लख्ख प्रकाशात पाणवठ्यावरील प्राणी गणना करण्यात आली. या गणनेत कोल्हापूर , सांगली , सातारा या तीन जिल्ह्यातील ३० हून अधिक स्वंय सेवकांनी स्वंयस्फूर्तीने सहभाग घेतला.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक नानासाहेब लडकत व उपसंचालक उत्तम सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्राणी गणनेचा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी प्रकल्पातील पाणवठ्यावर ५० मचाण बांधण्यात आली होती. या मचाणावरून रात्रीच्या वेळीस पाणवठ्यावर येणारे वन्यप्राणी प्रत्यक्षात पाहुन ही गणना करण्यात आली. यावेळी या प्रकल्पात ३०८ प्राण्यांची नोंद झाली असून १५ वेगवेगळ्या प्रजातीच्या वन्यप्राण्यांचे दर्शन झाल्याची माहिती वन्यजीव विभागाच्यावतीने देण्यात आली.