बाईई.. रंकाळ्यावर काय हा प्रकार, महिलेच्या अंगात आल्याचा व्हिडीओ व्हायरल; पर्यावरणप्रेमींतून संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 15:24 IST2025-06-28T15:24:26+5:302025-06-28T15:24:37+5:30
कोल्हापूर : कोल्हापूरच्या ऐतिहासिक रंकाळा चौपाटीवर एका महिलेच्या अंगात येत असल्याचे आणि ती चित्रविचित्र आवाज काढत असल्याचा व्हिडीओ जोरदार ...

बाईई.. रंकाळ्यावर काय हा प्रकार, महिलेच्या अंगात आल्याचा व्हिडीओ व्हायरल; पर्यावरणप्रेमींतून संताप
कोल्हापूर : कोल्हापूरच्या ऐतिहासिक रंकाळा चौपाटीवर एका महिलेच्या अंगात येत असल्याचे आणि ती चित्रविचित्र आवाज काढत असल्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला. तो पाहून पर्यावरणप्रेमींतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.
हे लोक मुख्यत: मराठवाड्याकडील आहेत. पायात चाळ, हलगी, खांद्यावर चाबूक, मळवट भरलेल्या स्थितीत ते तिथे येतात. चौपाटीजवळच्या घाटावर ते सर्व अंघोळ करतात. सोबत आणलेले देवाचे टाक, झाड रंकाळ्यात स्वच्छ करतात आणि घाटावर येऊन त्यांची पूजा करतात. पूजा झाल्यावर त्यातील महिलेच्या अंगात घुमू लागते. हलगी वाजत असते. मळवट भरलेली महिला मोठमोठ्याने आवाज करीत घुमत असते. काही वेळाने सोबतच्या महिलेच्या केसाला केस लावले की, तिच्याही अंगात येते.
असाच प्रकार शुक्रवारी रंकाळ्यावर घडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि बाईई.. रंकाळ्यावर काय हा प्रकार अशीच काहीशी प्रतिक्रिया लोकांतून उमटली. गेल्या सहा महिन्यांपूर्वी चौपाटीवर एकाच वेळी मोठ्या संख्येने स्त्री-पुरुषांना बसवून त्यांची पूजा केली होती.
रंकाळा टॉवर ते तांबट कमानदरम्यानच्या मुख्य मार्गावरच गाड्या लावून तिथेच हे लोक नाश्ता करून खातात. त्याचा केरकचरा त्या ठिकाणीच टाकला जातो. रंकाळ्यावर होणाऱ्या या प्रथा-परंपरा पर्यावरणदृष्ट्या व स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून हानिकारक आहेत. त्यास पायबंद घालावा. - शिवशाहीर राजू राऊत, रंकाळाप्रेमी
पर्यावरणदृष्ट्या रंकाळ्याची हानी होऊ नये. रंकाळ्याच्या पाण्यात व चौपाटीवर धार्मिक विधी होऊ नये, यासाठी महानगरपालिकेने कायमस्वरूपी सुरक्षारक्षक ठेवून हे प्रकार थांबविण्याची गरज आहे. - ॲड. अजित चव्हाण, शिवाजी पेठ, कोल्हापूर