मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत वेखंडवाडी उपसरपंच सखुबाई खोत यांचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 21:59 IST2025-09-01T21:59:15+5:302025-09-01T21:59:37+5:30
स्थानिक पातळीवरूनही या आंदोलनाला बळ मिळावे, या हेतूने सखुबाई खोत यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत वेखंडवाडी उपसरपंच सखुबाई खोत यांचा राजीनामा
लोकमत न्युज नेटवर्क
पन्हाळा: वेखंडवाडी (ता. पन्हाळा) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सखुबाई भगवान खोत यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला राज्यभरातून जनसमर्थन मिळत आहे. त्यातच स्थानिक पातळीवरूनही या आंदोलनाला बळ मिळावे, या हेतूने सखुबाई खोत यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.
सखुबाई खोत यांनी आपल्या राजीनाम्याची प्रत सरपंच संतोष खोत यांच्याकडे सादर केली असून, मराठा समाजाच्या न्याय्य हक्कासाठी लढा देणे ही काळाची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. आरक्षणाशिवाय समाजातील होतकरू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य तसेच तरुणांचे रोजगाराच्या संधींवर मोठा परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपसरपंच पदाचा राजीनामा हा समाजहितासाठी केलेला निर्णय असल्याचे नमूद करत त्यांनी इतरांनीही आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले आहे.