"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 19:39 IST2025-08-02T19:39:29+5:302025-08-02T19:39:54+5:30

नांदणी मठातील महादेवी हत्तीणीसंदर्भात वनताराकडून प्रसिद्धीपत्रक काढून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

Vantara clarified about the migration of Mahadevi elephant in Kolhapur | "आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

Mahadevi Elephant: कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणीमधील महादेवी या हत्तीणींला न्यायालयाच्या आदेशाने पोलीस बंदोबस्तात गुजरातमधील वनतारा पशुसंग्रहालयाच्या ताब्यात देण्यात आले होते. महादेवी  हत्ती‍णीला वनतारामध्ये नेण्यावरून दोन आठवडे कोल्हापूर आणि नांदणी परिसरात संघर्ष सुरू होता. मात्र कोर्टाच्या आदेशानंतर महादेवीला वनताराकडे सोपण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाविरोधात कोल्हापुरकर रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर आता वनताराकडून प्रसिद्धी पत्रक काढून तिथे महादेवीची हळुवारपणे काळजी घेतली जात असल्याचे सांगण्यात आलं आहे.

महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारामध्ये नेल्यानंतर वनताराबद्दल नांदणीकरांसोबतच कोल्हापूरवासियांनी प्रचंड रोष व्यक्त केला होता. वनतारा हे पशुसंग्रहालय  रिलायन्स उद्योगसमूहाचे अनंत अंबानी यांच्या मालकीचे आहे. त्यामुळे कोल्हापुरात बॉयकॉट जिओ, सह्यांची मोहीम सुरू झाली. त्यानंतर वाढता रोष पाहून वनताराची टीम नांदणी मठाधीशांसोबत चर्चेसाठी कोल्हापुरात दाखल झाली. त्यानंतर माधुरीला कोल्हापुरात आणायचे असेल तर कायदेशीर प्रक्रियाच करावी लागेल अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. आता वनताराकडून अधिकृत प्रसिद्धीपत्रक काढून महादेवीच्या भविष्यासाठी सर्व शक्यता तपासत असल्याचे सांगण्यात आलं आहे.

"कोल्हापूर येथील स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठ मधून अलिकडेच स्थलांतरित झालेल्या महादेवी (माधुरी) हत्तीणी सोबत असलेल्या प्रेम आणि आध्यात्मिक भावनांविषयी वनतारा खूप आदर बाळगते. आम्ही ओळखतो की तिची तिथे उपस्थिती केवळ प्रतीकात्मक नव्हती, तर अनेकांसाठी पवित्र होती. आम्ही हे स्पष्ट आणि आदरपूर्वक सांगू इच्छितो की वनताराने ही कार्यवाही स्वतःहून केली नाही. ही कार्यवाही माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत करण्यात आली, ज्याला नंतर भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयानेही मान्यता दिली. आम्ही या स्थलांतराचे आरंभकर्ता नव्हतो, तर न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारी संस्था होतो, जी हिच्या देखरेखीची जबाबदारी पार पाडत आहे," असं वनताराने म्हटलं.

"माधुरी हिच्या आरोग्याचे आणि दीर्घकालीन कल्याणाचे रक्षण करणे हाच आमचा एकमेव हेतू राहिला आहे. हिला आमच्या देखरेखीखाली आणण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रेमपूर्वक, जबाबदारीने आणि कायदेशीर तसेच नैतिक निकषांचे काटेकोर पालन करत पार पाडली गेली. जनतेच्या तीव्र भावनिक प्रतिसादाची आम्हाला पूर्ण जाणीव आहे आणि आम्ही त्याबाबद मनापासून सहानुभूती बाळगतो. म्हणूनच, करुणा आणि ऐक्याच्या भावनेतून, आम्ही कोल्हापूर येथील जैन मठ व पूज्य स्वामीजी यांच्यासोबत थेट संवाद सुरू केला आहे. कायदेशीर आणि पशुवैद्यकीय सल्ल्याच्या आधारे, आम्ही माधुरी हिच्या भविष्यासाठी सर्व शक्यता तपासत आहोत. ज्या द्वारे शांततामय मार्गे माधुरी च्या कल्याणासोबतच समाजाच्या भावनांचा देखील सन्मान राखला जाईल, असं आश्वासन वनताराकडून देण्यात आलं आहे.


"वनतारा कोणत्याही धर्म, प्रदेश किंवा परंपरेच्या विरोधात नाही. आम्ही अशा मुक्या जीवांच्या सेवेसाठी आहोत, जे मानवी करुणेवर अवलंबून आहेत. आम्ही पारदर्शकतेस, कायद्याच्या पालनास आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे करुणेला पूर्णपणे वचनबद्ध आहोत. आम्ही जनतेला संघर्षासाठी नाही, तर माधुरी व अशा प्रत्येक प्राण्याच्या सन्मानपूर्वक व शांत आयुष्याच्या अधिकारासाठी आमच्या सोबत उभे राहण्याचे विनम्र आवाहन करतो," असं वनताराकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Web Title: Vantara clarified about the migration of Mahadevi elephant in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.