Atal Bihari Vajpayee : वाजपेयी हे दुर्मिळ व्यक्तिमत्व : चंद्रकांत पाटील, कोल्हापूर भाजपतर्फे श्रध्दांजली सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 17:52 IST2018-08-17T17:51:53+5:302018-08-17T17:52:46+5:30
केवळ आणि केवळ समाजाच्या भल्याचे ध्येय ज्यांनी आयुष्यामध्ये ठेवले. ज्यांच्याबद्दल एकही वाद निर्माण झाला नाही असे अटलबिहारी वाजपेयी हे एक दुर्मिळ व्यक्तिमत्व होते अशा शब्दात राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली वाहिली.

Atal Bihari Vajpayee : वाजपेयी हे दुर्मिळ व्यक्तिमत्व : चंद्रकांत पाटील, कोल्हापूर भाजपतर्फे श्रध्दांजली सभा
कोल्हापूर : केवळ आणि केवळ समाजाच्या भल्याचे ध्येय ज्यांनी आयुष्यामध्ये ठेवले. ज्यांच्याबद्दल एकही वाद निर्माण झाला नाही असे अटलबिहारी वाजपेयी हे एक दुर्मिळ व्यक्तिमत्व होते अशा शब्दात राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली वाहिली.
भाजपच्या कार्यालयामध्ये शुक्रवारी दुपारी वाजपेयी यांनाश्रध्दांजली वाहण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री पाटील बोलत होते. वाजपेयी यांच्या आठवणी जागवत पाटील म्हणाले, सच्चा कार्यकर्ता कसा असावा याचे जिवंत उदाहरण म्हणजे वाजपेयी. सातत्याने समाजाचा, देशाचा आणि विश्वकल्याणाचा विचार त्यांच्या मनामध्ये असे.
पंचगंगा बँकेचे चेअरमन राजाराम शिपुगडे म्हणाले, समरसता परिषदेसाठी आलेल्या वाजपेयी यांना कोल्हापुरात विरोध झाला. मात्र त्याच सभेत त्यांनी इंदिरा गांधी यांचा गौरव करता पक्षीय मतभेत बाजुला ठेवून राष्ट्रहिताला प्राधान्य दिले.
आमदार अमल महाडिक म्हणाले, त्यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी प्रयत्न करणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली आहे. सुभाष वोरा म्हणाले, तरूण, तडफदार वाजपेयी आम्ही पाहिले आहेत. त्यांना श्रध्दांजली वाहणे ही दुर्देवी वेळ आहे. कोणताही बडेजाव नसणारा असा हा नेता प्रेरणादायी होता.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, प्र. द. गणपुले, महापालिकेतील गटनेते विजय सुर्यवंशी, भाजप महानगर अध्यक्ष संदीप देसाई यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष आशिष ढवळे, आर. डी. पाटील, माणिक पाटील, जयश्री जाधव,राहूल चिकोडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हेमंत आराध्ये यांनी सूत्रसंचालन केले.
चंद्रकांत यह तो मयनगरी है
पालकमंत्री पाटील म्हणाले, आजच जम्मू काश्मिरमध्ये झालेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सभेचा फोटो मला पाठवण्यात आला आहे. मी अखिल भारतीय संघटन मंत्री असल्याने वाजपेयी यांच्यासोबत व्यासपीठावर होतो. यानंतर बऱ्याच वर्षांनी मुंबईजवळच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या उद्घाटनासाठी आलेल्या वाजपेयी यांनी प्रबोधिनी फिरून पाहिल्यानंतर, ‘चंद्रकांत, यह तो मयनगरी है’ असे उद्गार काढले होते अशी आठवण पाटील यांनी सांगितली.
दोन महिन्यांपूर्वी घेतली होती भेट
मी आणि मुख्यमंत्री दोन महिन्यांपूवीं दिल्लीला गेलो होतो. तेव्हा वाजपेयी यांना भेटण्यासाठी गेलो होते. त्यावेळी त्यांच्या कानात परिचितांनी सांगितले की, गंगाधरपंत का चिरंजीव आया है, अब सीएम बन गए है. चंद्रकांत आए है. परंतू दुर्देवाने अटलजींना यातील काहीही कळत नव्हते अशी आठवणही पाटील यांनी सांगितली.