Kolhapur: किरणोत्सव पूर्ण क्षमतेने, देवीच्या मळवटापर्यंत किरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 11:57 IST2025-01-31T11:55:43+5:302025-01-31T11:57:53+5:30

पूर्ण किरणोत्सव झाल्याने भाविकांतून समाधान

Uttarayan Kironotsav was held in full capacity at Karveer Nivasini ambabai Temple | Kolhapur: किरणोत्सव पूर्ण क्षमतेने, देवीच्या मळवटापर्यंत किरणे

करवीरनिवासिनी श्रीअंबाबाई मंदिराच्या किरणोत्सव सोहळ्यात गुरुवारी मावळतीची सूर्यकिरणे देवीच्या चरणस्पर्शापासून मूर्तीच्या मळवटापर्यंत पोहोचली. (छाया : आदित्य वेल्हाळ)

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्रीअंबाबाई मंदिराच्या उत्तरायण किरणोत्सव सोहळ्यात गुरुवारी दुसऱ्या दिवशी पूर्ण क्षमतेने किरणोत्सव झाला. मावळतीच्या सूर्यकिरणांचा प्रवास देवीच्या मूर्तीच्या चेहऱ्यापर्यंत पोहोचून देवीच्या मळवटावर पोहोचला. आज, तिसऱ्या दिवशी किरणे किरिटांच्यावर पोहाेचण्याची अपेक्षा आहे.

या किरणोत्सव सोहळ्याच्या पहिल्या दिवशी सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी मावळतीची सूर्यकिरणे महाद्वाराच्या कमानीतून आत आली. त्यानंतर सदर, गणपती मंदिर, कासव चौक, पितळी आणि चांदीचा उंबरठा ओलांडून ६ वाजून १२ मिनिटांनी किरणांनी देवीचा चरणस्पर्श केला. तेथून पुढे ६ वाजून १६ मिनिटांपासून चेहऱ्यावरून किरिटापर्यंत पोहोचून ती ६ वाजून १७ व्या मिनिटाला लुप्त झाली. पूर्ण किरणोत्सव झाल्याने भाविकांतून समाधान व्यक्त झाले.

स्वच्छ वातावरण आणि किरणोत्सव मार्गातील अडथळे दूर केल्याने हा किरणोत्सव पूर्ण क्षमतेने झाला. अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली. विवेकानंद महाविद्यालयाचे निवृत्त खगोल अभ्यासक प्रा. मिलिंद कारंजकर यांनी या किरणांची तीव्रता अपेक्षेप्रमाणे १६७०० इतकी राहिल्याचे स्पष्ट केले.

किरणांची तीव्रता चारपटींनी अधिक

  • हवेत धूलिकण तसेच ढग नव्हते. स्वच्छ वातावरण होते.
  • मावळतीच्या सूर्यकिरणांची तीव्रता चारपटींनी अधिक होती.
  • आर्द्रतादेखील अपेक्षेप्रमाणे ४५ टक्के होती.
  • या सर्व स्थितीमुळे पाच दिवसांचा पूर्ण किरणोत्सव झाला.
  • सूर्यकिरणे देवीच्या मळवटापर्यंत पोहोचली.
  • नोव्हेंबरमधील किरणोत्सवात काही अंशी ढगाळ वातावरणाचा अडथळा होता.
  • उत्तरायण कालखंडात सलग दोन दिवस वातावरण स्वच्छ राहिल्याने किरणोत्सव चांगला झाला.


किरणांचा प्रवास
जागा - वेळ                

  • महाद्वार कमान : ५: २०                        
  • सदर : ५ : २९                                    
  • गणपती मंदिर मागील बाजू : ५ : ४०
  • कासव चौक : ५:५९                                                
  • पितळी उंबरठा : ६:०२                        
  • चांदीचा उंबरठा : ६ :०५                        
  • गर्भगृह तिसरी पायरी : ६:०७
  • कटांजन : ६:१०                        
  • चरण स्पर्श : ६:१२
  • गुढघ्यापर्यंत : ६:१३
  • कमरेवर : ६:१४
  • चेहरा ते मळवट : ६ वाजून १६ ते १७ मिनिटे

Web Title: Uttarayan Kironotsav was held in full capacity at Karveer Nivasini ambabai Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.