उसको मिली कोल्हापुरे...हमको मिली कोल्हापुरी; मंत्री नितीन गडकरींनी 'तो' किस्सा ऐकवतानाच संसदेत हास्यकल्लोळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 17:54 IST2026-03-14T17:53:02+5:302026-03-14T17:54:51+5:30
गडकरी यांचा हा राजकारणापलीकडील वेगळा स्वॅग उभ्या सभागृहाला निखळ हास्यात खिळवून गेला.

उसको मिली कोल्हापुरे...हमको मिली कोल्हापुरी; मंत्री नितीन गडकरींनी 'तो' किस्सा ऐकवतानाच संसदेत हास्यकल्लोळ
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने, देशात सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेला जिल्हा, जिल्ह्याची सुबत्ता अशा एक ना अनेक गोष्टींचे वर्णन करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वी संसदेत कोल्हापूरचे गुणगाण गायले.
मात्र, या कौतुकाच्या वर्षावात मंत्री गडकरी यांनी थेट १९८० मधील पद्मिनी कोल्हापुरे या अभिनेत्रीने प्रिन्स चार्ल्सचा चुंबन घेतल्याचा किस्सा ऐकवतानाच 'उसको मिली कोल्हापुरे, हमको मिली कोल्हापुरी' असे त्यावेळी म्हटले गेल्याची सभागृहाला आठवण करून देताच सारेच हास्यकल्लोळात बुडाले. मंत्री गडकरी यांचा हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
कोल्हापुरातील बास्केट ब्रिजबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेत प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात २५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रस्त्यांची कामे झाल्याचे सांगितले. बास्केट ब्रीजचे डिझाईन खासगी संस्थेकडून करून घेतलेले असूनही तेच आम्ही स्वीकारल्याचे सांगितले. जिल्ह्यात सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेला कोल्हापूर जिल्हा असल्याचे आवर्जून नमूद केले. साखर कारखाने, शेती, जलसिंचन यात हा जिल्हा समृद्ध असून येथील लोक उद्यमशील आहेत.
औद्योगिक कॉरिडॉर विकसित होत असून मुंबई, पुण्यानंतर हे शहर महत्त्वाचे केंद्र आहे हे सांगतानाच मंत्री गडकरी यांनी येथील चप्पल जगभरात जात असल्याचे नमूद केले. हे सांगतानाच गडकरी यांनी एका अभिनेत्रीने प्रिन्स चार्ल्स यांचे मुंबईत स्वागत करताना प्रिन्स चार्ल्स यांचे चुंबन घेतले. यावर भोपाळमधील कवी शरद जोशी यांच्या ‘उसको मिली कोल्हापुरे, हमको मिली कोल्हापुरी’ या कवितेच्या ओळी सभागृहाला ऐकवल्या. गडकरी यांचा हा राजकारणापलीकडील वेगळा स्वॅग उभ्या सभागृहाला निखळ हास्यात खिळवून गेला.