'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 18:39 IST2025-11-18T18:23:04+5:302025-11-18T18:39:05+5:30
माजी खासदार संजय मंडलिक यांनी मुश्रीफ यांच्यावर टीका केली.

'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या युती झाल्याची पाहायला मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीत हायहोल्टेज ठरलेला कागल विधानसभा मतदार संघात आता राजकीय हालचालींना वेग आला आहे, दोन्ही कट्टर विरोधक एकत्र आले आहेत. दरम्यान, माजी खासदार संजय मंडलिक यांनी मुश्रीफ यांच्यावर टीका केली.
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
"कागल विधानसभा मतदारसंघातून सलग सहावेळा विजयी झालेले आणि राज्याच्या मंत्रिमंडळात तब्बल नऊवेळा स्थान मिळवणारे, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना वाटतं की, आपल्याला आमदार राहायचं आहे. त्यामुळं प्रत्येकाला जवळ घेऊन त्यांच्यासोबत युती करायची आणि युती झाल्यावर वापरा आणि फेकून द्या ही मुश्रीफ यांची नीती आहे, अशी टीका मंडलिक यांनी मुश्रीफ यांच्यावर केली.
संजय मंडलिक यांनी आज प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मुश्रीफ यांच्यावर टीका केली. "मंत्री मुश्रीफांना माझ्या शुभेच्छा आहेत, याच आयुष्यात नाहीतर पुढच्या आयुष्यात देखील त्यांनी आमदार आणि मंत्री व्हावं, पण हे करत असताना मैत्री करतानाच्या उपकाराची त्यांनी जाणिव ठेवावी. ज्यांनी त्यांना निर्माण केलं ते सदाशिवराव मंडलिक आणि विक्रमसिंह घाटगे यांना विसरू नये. मुश्रीफ प्रत्येक पायरी चढतात मात्र चढल्यानंतर ती पायरी छाटायचा प्रयत्न करतात", असा टोला मंडलिक यांनी लगावला.