पंतप्रधानांशी लढण्यापेक्षा उद्धव यांनी कोरोनाशी लढावे; देवेंद्र फडणवीसांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 15:43 IST2020-08-29T15:29:45+5:302020-08-29T15:43:26+5:30
सरकारची अकार्यक्षमता लपवण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवले जात आहे. पंतप्रधानांशी लढण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी कोरोनाशी लढावे, अशा शब्दात राज्य सरकारवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.

पंतप्रधानांशी लढण्यापेक्षा उद्धव यांनी कोरोनाशी लढावे; देवेंद्र फडणवीसांचा टोला
कोल्हापूर : सरकारची अकार्यक्षमता लपवण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवले जात आहे. पंतप्रधानांशी लढण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी कोरोनाशी लढावे, अशा शब्दात राज्य सरकारवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.
देवेंद्र फडणवीस यांनी आज, शनिवारी दुपारी कोल्हापूरच्या दौऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोरोना स्थितीची माहिती दिली. त्यानंतर दुपारी सीपीआर रुग्णालयाच्या कोविड सेंटरला त्यांनी भेट दिली. पत्रकारांशी बोलताना त्यांनी कोल्हापुरात ऑक्सीजन बेड वाढविण्याची गरज असल्याने यासंदर्भात आरोग्य मंत्र्यांशी आपण बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, समरजितसिंह घाटगे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, कोल्हापूर भाजपचे अध्यक्ष राहुल चिकोडे त्यांच्यासमवेत होते.
📍LIVE| Interacting with media, Kolhapur https://t.co/WJxBNxNrIB
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 29, 2020
देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या दोन महिन्यांत वेगवेगळ्या जिल्ह्यांत भेटी देऊन तेथील कोरोना स्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच तेथील त्रुटीही दाखवून दिल्या आहेत. पुण्यातील जम्बो कोविड रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी फडणवीस पुण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी आज सातारा,सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना स्थितीची माहिती घेतली. कोरोना स्थितीची माहिती भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून संकलित केली जात असून, जिल्ह्यातील वाढत्या मृतांच्या संख्येकडेही फडणवीस राज्याचे लक्ष वेधणार आहेत.
डरना है, या लढना है?
आज सर्व अधिकार एकाच्या हातात एकवटले जात आहे, अशावेळी राज्य सरकारांचा अर्थ काय? राज्यांनी केवळ होकारार्थी मान डोलवायची का, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासमवेतच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचे फेडरल स्ट्रक्चर लक्षात घेऊन राज्यघटना तयार केली आहे. त्यात सर्वांना अधिकार दिले आहेत. जर आपण त्याचा आदर करणार नाही, तर मग आपल्याकडे लोकशाही कुठे आहे? आपल्याला एकत्र यायला संकटाची गरज कशाला हवी? आपण एरवीसुद्धा भेटले पाहिजे. ज्यामुळे संकटच घाबरून म्हणेल की हे लोक एकत्र आहेत. एक बार तय करो डरना है, या लढना है, असे म्हणत ठाकरे यांनी सोनिया गांधी यांच्याकडे सहकार्याचा हात पुढे केला होता.