कोल्हापूर : शेतकरी, शेत मजूर, कष्टकऱ्यांचे प्रश्न घेऊन राज्य व केंद्र सरकारच्या कारभारावर आसूड ओढत चंदगड ते शिरोळपर्यंत ‘शक्तिपीठ नको, कर्ज माफी करा’ हा नारा देत उद्धवसेनेच्या वतीने दिंडी काढली जाणार आहे. दिंडीला १० ऑगस्टपासून सुरुवात होणार असून, १४ ऑगस्टला शिरोळमध्ये सांगता होणार आहे.आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सामान्य माणसाच्या प्रश्नांवर दिंडी काढली जाणार आहे. त्याचा आढावा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईत घेतला.
यावेळी ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी माणूस पिचला आहे. त्यांचे प्रश्नांसाठी आपणाला लढा उभारायचा आहे. शासनाचे घोटाळ्यावर लक्ष केंद्रित करीत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांना हात घाला. सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्वच विधानसभा मतदारसंघात दिंडी ताकदीने घेऊन जावे, असेही त्यांनी सांगितले.बैठकीला खासदार संजय राऊत, संपर्क नेते विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते संजय पवार, माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, युवा जिल्हाप्रमुख मंजित माने, आदी उपस्थित होते.