Kolhapur Politics: मुंबईतून एकीची हाळी.. कोल्हापुरात उद्धव-मनसैनिक देणार का टाळी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 16:38 IST2025-07-07T16:37:42+5:302025-07-07T16:38:25+5:30
दोन्ही पक्षांना महापालिकेत संधी

Kolhapur Politics: मुंबईतून एकीची हाळी.. कोल्हापुरात उद्धव-मनसैनिक देणार का टाळी?
कोल्हापूर : गेल्या २० वर्षांपासून एकत्र येण्याच्या प्रतीक्षेत असलेले राज आणि उद्धव ठाकरे मराठी भाषेच्या निमित्ताने एकत्र आले असले तरी या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांची मने एक होणार का, हा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन्ही बंधूंनी मुंबईतून एकीची हाळी दिली असली तरी कोल्हापूर जिल्ह्यात उद्धवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते एकमेकांना मदतीची टाळी देणार का, याची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विशेष प्रेम असल्याने हा जिल्हा शिवसेनामय झाला होता. मात्र, पुढे राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून वेगळी चूल मांडल्याने शिवसेनेतील अनेक शिलेदारांनी राज यांच्यासोबत जाणे पसंत केले. त्यानंतर तब्बल २० वर्षे शिवसेना आणि मनसे यांच्यातील नेते-कार्यकर्त्यांमध्ये उभा संघर्ष सुरू आहे. महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही मनसे-उद्धवसेचे कार्यकर्ते अनेकदा आमने-सामने उभे ठाकले होते. मात्र, मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंनी एकीची हाक दिल्याने जिल्ह्यात याबाबत उत्सुकता आहे.
दोन्ही पक्षांना महापालिकेत संधी
- २०१४ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून शिवसेनेचे ६ आमदार विधानसभेत गेले होते. मात्र, सेनेच्या फुटीनंतर उद्धवसेना काहीशी कमकुवत झाली आहे.
- २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत उद्धवसेनेला अवघ्या दोन जागा वाट्याला आल्या. तेथेही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. उत्तरची हक्काची जागा काँग्रेसला दिल्याने महापालिका कार्यक्षेत्रात उद्धवसेनेचे अस्तित्व नगण्य झाले आहे.
- विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत मनसेने उत्तरमध्ये उमेदवार उभा करत महापालिका निवडणुकीची पेरणी केली आहे. या दोन्ही पक्षांचे सध्या महापालिका क्षेत्रातच थोडेफार अस्तित्व जाणवते. त्यामुळे एकीच्या हाळीला दोन्ही पक्षांतील स्थानिक कार्यकर्त्यांनी टाळी दिली तर महापालिकेत काहींना संधी मिळू शकते.
कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना आणि मनसेमध्ये कधीच वाद झाले नाहीत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. आम्ही त्यांच्या आदेशाप्रमाणे काम करू. - विजय देवणे, सहसंपर्कप्रमुख, उद्धवसेना, कोल्हापूर.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच आहेत. त्यामुळे मने जुळायला फार वेळ लागणार नाही. वरिष्ठांचे आदेश आले तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही एकत्र लढू. -राजू दिंडोर्ले, जिल्हाध्यक्ष, मनसे कोल्हापूर.