Kolhapur: अंबाबाई मंदिर आवारातील मणिकर्णिका कुंड परिसरात आढळली दोन शिवलिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 12:05 IST2024-12-05T12:04:57+5:302024-12-05T12:05:41+5:30
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आवारातील मणिकर्णिका कुंड परिसरात छोट्या दोन देवळींमध्ये शिवलिंग आढळले आहे. माउली लाॅजच्या ...

Kolhapur: अंबाबाई मंदिर आवारातील मणिकर्णिका कुंड परिसरात आढळली दोन शिवलिंग
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आवारातील मणिकर्णिका कुंड परिसरात छोट्या दोन देवळींमध्ये शिवलिंग आढळले आहे. माउली लाॅजच्या खाली असलेल्या दगडी भिंतींसमोरील माती, दगडाचा ढिगारा काढताना हे शिवलिंग आढळले, तर तिसरी एक देवळी रिकामी आहे.
अंबाबाई मंदिर आवारातील मणिकर्णिका कुंडाच्या जतन संवर्धनाचे काम पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून सुरू करण्यात येत आहे. अत्यंत कासवगतीने सुरू असलेले या कामात सध्या कुंडाच्या परिसरातील ढिगारा हटविण्यात येत आहे. हे करताना माउली लॉजच्या खालच्या बाजूला असलेल्या मणिकर्णिका कुंडाच्या दगडी भिंतींमध्ये तीन देवळी आढळले आहेत. यातील दोन देवळींमध्ये शिवलिंग आहे व तिसरी देवळी रिकामी आहे. कुंच्च्या जतन संवर्धनासाठीचे दगड घडविण्याचे काम सध्या सुरू असून, त्याला अजूनही कासवगतीच आहे.
संपादनाचा प्रश्न प्रलंबितच
माउली लॉजच्या संपादनाशिवाय त्या खाली असलेल्या कुंडाच्या भागाचे जतन संवर्धन होणे शक्य नाही, पण येथील तीन-चार मिळकतधारकांची नावे प्रॉपर्टी कार्डावर नाहीत. त्यामुळे संपादनापोटी नुकसान भरपाई कुणाच्या नावे, कुणाच्या खात्यावर वर्ग करायची, यामुळे संपादनाचे भिजत घोंगडे पडले आहे.
मिळकतधारकांकडून अडवणूक?
देवस्थान समितीने मिळकतधारकांना प्रॉपर्टी कार्डावर नावे लावून घेण्याची सूचना केली, पण मिळकतधारकांकडूनच त्याला प्रतिसाद येत नसल्याचे प्रथमदर्शनी चित्र आहे. नियमानुसार देवस्थान समितीने ठरविलेली रक्कम त्यांना मान्य नाही का की, त्यांनी मंदिराच्या कामासाठी सहकार्यच करायचे नाही असे ठरविले आहे का, अशी शंका आता येत आहे.