कोल्हापुरातील कळंबा कारागृहात काडतूस बाळगणारे आंदेकर टोळीतील दोन कैदी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 13:23 IST2025-11-26T13:22:11+5:302025-11-26T13:23:00+5:30
मोक्का न्यायालयाच्या आदेशाने कारवाई

कोल्हापुरातील कळंबा कारागृहात काडतूस बाळगणारे आंदेकर टोळीतील दोन कैदी अटकेत
कोल्हापूर : कळंबा कारागृहात कैद्यांवर दहशत माजवण्यासाठी काडतूस बाळगणाऱ्या दोन कैद्यांना जुना राजवाडा पोलिसांनी पुणे येथील मोक्का न्यायालयाच्या आदेशाने मंगळवारी (दि. २५) अटक केली. सुरेश बळिराम दयाळू आणि आमीर उर्फ चंक्या असीर खान अशी अटकेतील दोघांची नावे आहे. हे दोघे पुण्यातील आंदेकर टोळीतील गुन्हेगार आहेत. त्यांनी कारागृहातील स्वच्छतागृहात लपवलेले काडतूस एक नोव्हेंबरला सुरक्षा रक्षकांना सापडले होते.
एक नोव्हेंबरला कळंबा कारागृहाच्या सर्कल क्रमांक सातच्या स्वच्छतागृहाची झडती घेताना प्लास्टिकच्या पिशवीत लपवलेले जिवंत काडतूस सापडले होते. कैद्यांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी आंदेकर टोळीतील कैदी दयाळू आणि खान या दोघांनी काडतूस लपविल्याचे कारागृह अधिकाऱ्यांच्या तपासात स्पष्ट झाले. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल झाला होता.
जुना राजवाडा पोलिसांनी पुण्यातील मोक्का न्यायालयाच्या आदेशाने मंगळवारी दोन्ही कैद्यांचा ताबा घेऊन त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्यांनी कोणाकडून काडतूस आणले? त्यांच्याकडे पिस्तूल आहे काय? याचा तपास केली जाईल, अशी माहिती जुना राजवाडा पोलिसांनी दिली.