Kolhapur: सिद्धार्थनगर दंगलीतील आणखी दोघांना अटक, पाचजणांची पोलिस कोठडीत रवानगी, धरपकड सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 18:34 IST2025-08-26T18:34:31+5:302025-08-26T18:34:43+5:30

तपासावर वरिष्ठांची नजर

Two more arrested in Siddharthnagar riots in Kolhapur five remanded in police custody | Kolhapur: सिद्धार्थनगर दंगलीतील आणखी दोघांना अटक, पाचजणांची पोलिस कोठडीत रवानगी, धरपकड सुरू

Kolhapur: सिद्धार्थनगर दंगलीतील आणखी दोघांना अटक, पाचजणांची पोलिस कोठडीत रवानगी, धरपकड सुरू

कोल्हापूर : फलकबाजीच्या वादातून शुक्रवारी (दि. २२) रात्री सिद्धार्थनगर कमानीजवळ झालेल्या दंगलीतील आणखी दोघांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी सोमवारी (दि. २५) रात्री अटक केली. आसिफ अब्दुल शेख (वय ३४) आणि इकबाल सिकंदर महात (३५, दोघे रा. राजेबागेस्वार दर्ग्याजवळ, कोल्हापूर) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. रविवारी अटक केलेल्या पाचजणांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.

तौसिफ निजाम शेख (३२), निहाल रहिमतुल्ला शेख (२१), सद्दाम यारजंग महात (३७), सूरज ऊर्फ अश्पाक शब्बीर नायकवडी (३४) आणि इक्बाल दाऊद सरकवास (५५, सर्व रा. राजेबागेस्वार दर्ग्याजवळ, कोल्हापूर) अशी अटकेतील दंगलखोरांची नावे आहेत. अटकेतील एकूण दंगलखोरांची संख्या सात झाली.

राजेबागेस्वार येथील तरुण मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त सिद्धार्थनगर कमानीजवळ लावलेल्या फलकांवरून दोन गटांतील वादाला सुरुवात झाली होती. या वादाचे दंगलीत पर्यवसान झाल्याने दोन्ही गटांकडून प्रचंड दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटांतील सुमारे ४०० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

यातील ३१ जणांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले असून, त्यांची धरपकड सुरू आहे. रविवारी रात्री अटक केलेल्या पाचजणांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांकडून त्यांची अधिक चौकशी सुरू असून, दंगलीत सहभागी झालेल्या अन्य संशयितांची नावे निष्पन्न केली जात आहेत.

धरपकड सुरू

अटकसत्र सुरू होताच गुन्हे दाखल झालेल्या संशयितांनी पळ काढला आहे. लक्ष्मीपुरी पोलिसांनी सोमवारी रात्री दोन संशयितांना ताब्यात घेतले. आणखी काही दंगलखोर पोलिसांच्या रडारवर आहेत. गुन्ह्यातील त्यांचा सहभाग स्पष्ट होताच अटकेची कारवाई करणार असल्याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनी दिली.

तपासावर वरिष्ठांची नजर

दंगलीच्या गुन्ह्याचा तपास लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांच्याकडून सुरू आहे. मात्र, गंभीर प्रकार घडल्याने या गुन्ह्याच्या तपासावर पोलिस अधीक्षक योगेश कुमार आणि अपर पोलिस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांचेही लक्ष आहे. बच्चू यांनी सोमवारी दुपारी निरीक्षक कन्हेरकर यांच्याकडून तपासाचा आढावा घेतला. तसेच गुन्हा दाखल झालेल्या सर्व संशयितांना अटक करण्याच्या सूचना दिल्या.

Web Title: Two more arrested in Siddharthnagar riots in Kolhapur five remanded in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.