कोल्हापूरकरांच्या चिंतेत वाढ, राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे खुले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 05:32 PM2022-08-11T17:32:56+5:302022-08-11T18:01:18+5:30

पंचगंगेच्या पातळीत अशीच वाढ होत राहिली तर पूरपरिस्थिती गंभीर बनण्याची शक्यता आहे.

Two gates of Radhanagari Dam reopened, 7312 cusecs start of water discharge | कोल्हापूरकरांच्या चिंतेत वाढ, राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे खुले

कोल्हापूरकरांच्या चिंतेत वाढ, राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे खुले

googlenewsNext

कोल्हापूर : शहर परिसरात गेली दोन दिवस उघडीप दिली असली तरी जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसतच आहेत. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाच्या धारा सुरुच असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. राधानगरीधरणात मुबलक पाणीसाठा झाल्याने काल, बुधवार पासून धरणाच्या स्वयंचलित दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. यामुळे पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. काल राधानगरीचे चार दरवाजे उघडले होते यातील दोन दरवाजे बंद झाले. मात्र, पुन्हा आज दोन दरवाजे खुले झाले. काही वेळातच पाचवा दरवाजाही खुला झाल्याने धरणातून 8740 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. परिणामी पूरपरिस्थिती गंभीर बनण्याची शक्यता आहे.

पावसाचा जोर कमी झाला असला तरी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. आज, सायंकाळी पंचगंगेची पातळी ४१ फूट ८ इंच इतकी झाली असून धोक्याच्या पातळीच्या (43 फूट) दिशेने वाटचाल सुरू आहे. पंचगंगेच्या पातळीत अशीच वाढ होत राहिली तर पूरपरिस्थिती गंभीर बनण्याची शक्यता आहे. त्याआधीच काल, बुधवार पासून जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांमधील ग्रामस्थांचे स्थलांतर सुरू केले आहे. आंबेवाडी, प्रयाग चिखली, आरे आदी गावांमधील हजारो ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. सध्या पंचगंगा नदीवरील 73 बंधारे पाण्याखाली आहेत.

कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग बंद  

वादळी पावसामुळे कोल्हापूर-रत्नागिरी रोडवरील केर्ली जवळील यश हॅाटेल शेजारी वादळी वडाचे झाड रात्री उन्मळून पडले. या मार्गावर पुराचे पाणी आल्याने प्रशासनाने वाहतुकीसाठी हा रस्ता बंद केल्यामुळे वाहतुकीची कोडी झाली नाही.

उघडीप असली तरी पातळी स्थिर राहणार

राधानगरी धरणाचे दरवाजे खुले झाले तर ते पाणी पंचगंगेपर्यंत येण्यासाठी किमान आठ तास लागतात. त्यामुळे पावसाने उघडीप दिली तरी पंचगंगेची पातळी स्थिर राहणार आहे.

चिखली, आंबेवाडीतील 500 कुटुंबे स्थलांतरित

करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली व आंबेवाडी गावात अद्याप पुराचे पाणी आले नसले तरी दक्षता बाळगत जिल्हा प्रशासनाने दोन्ही गावांतील जवळपास 500 कुटुंबे सुरक्षितस्थळी स्थलांतरित केली आहेत.

कोल्हापूर-केर्ली मार्गावर पाणी

कोल्हापूर ते केर्ली दरम्यानच्या रस्त्यावर दीड फुट पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहतूक जोतिबामार्गे वळवण्यात आली आहे.

एसटीचे हे मार्ग बंद -
कोल्हापूर ते गगनबावडा
इचलकरंजी ते कुरुंदवाड
गडहिंग्लज ते ऐनापूर
मलकापूर ते शित्तूर
चंदगड ते दोडामार्ग
गगनबावडा ते करुळ घाट
आजरा ते देव कांडगाव

काल, बुधवारी राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे असे उघडत गेले
पहाटे 5.30 वाजता - गेट क्रमांक 6
सकाळी 8.55 वाजता - गेट क्रमांक 5
दुपारी 2.20 वाजता - गेट क्रमांक 3
दुपारी 3.20 वाजता - गेट क्रमांक 4

Web Title: Two gates of Radhanagari Dam reopened, 7312 cusecs start of water discharge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.