कोल्हापूरात रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारी टोळी जेरबंद, दोघेजण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 14:14 IST2021-04-20T13:45:57+5:302021-04-20T14:14:06+5:30
CoronaVIrus Police Kolahpur : दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोनाच्या विषाणूमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील स्थिती कठीण होत चालली आहे. कोरोनाच्या रुग्णांसाठी उपयोगी ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचाही तुटवडा जिल्ह्यात जाणवत असतानाच या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा छडा कोल्हापूर पोलिसांनी लावला असून दोनजणांना जेरबंद केले आहे. पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा साठा जप्त केला आहे.

कोल्हापूरात रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारी टोळी जेरबंद, दोघेजण ताब्यात
कोल्हापूर : दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोना विषाणूच्या उद्रेकमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील स्थिती कठीण होत चालली आहे. कोरोनाच्या रुग्णांसाठी उपयोगी ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचाही तुटवडा जिल्ह्यात जाणवत असतानाच या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा छडा कोल्हापूर पोलिसांनी लावला असून दोनजणांना जेरबंद केले आहे. पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा साठा जप्त केला आहे.
कोल्हापुरात साडेपाच हजार रुपयाचे हे इंजेक्शन काळ्याबाजारात तब्बल प्रत्येकी अठरा हजार रुपयांना एक याप्रमाणे जादा दराने विक्री करणारी टोळी कोल्हापूर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने जेरबंद केली आहे. योगीराज राजकुमार वाघमारे ( रा. न्यू शाहुपुरी, सासणे मैदान, कोल्हापूर, मूळ गाव- मोहोळ, जि. सोलापूर) व पराग विजयकुमार पाटील (रा. कसबा बावडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून रेमडेसिवीर या इंजेक्शनच्या अकरा बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या टोळीतील आणखीन एका साथीदाराचे नाव निष्पन्न झाले असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
कोरोना महामारीच्या काळात जीवनदायी ठरलेल्या रेमडेसीवीर या जीवन रक्षक इंजेक्शनचा कोल्हापूर जिल्ह्यात तुटवडा आहे. लोकांच्या अडचणीचा गैरफायदा घेऊन रेमडेसीवीर इंजेक्शन काळ्याबाजारात जादा दराने विक्री करणारी टोळी कोल्हापूर जिल्ह्यात कार्यरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत व त्यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कोल्हापुरात सासणे मैदान परिसरातील "मणुमाया" या इमारतीच्या तळमजल्यावर छापा टाकून योगीराज वाघमारे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विक्री करण्यासाठी कब्जात बाळगलेल्या रेमडेसिवीर या औषधाच्या तीन बाटल्या मिळून आल्या.
अधिक चौकशी करता त्याने ती औषधे पराग पाटील यांच्याकडून घेतल्याचे सांगितले. पाटील हा रेमडेसिविर औषधाच्या आणखीन बाटल्या घेऊन येणार असल्याची माहिती योगिराजने पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून पराग पाटील यालाही अटक केली. त्याच्याकडे रेमडेसिविर या औषधाच्या आठ बाटल्या मिळून आल्या. पोलिसांनी एकूण अकरा बाटल्या जप्त केल्या.
अवघ्या साडेपाच हजार रुपये किमतीला एक मिळणारी ही औषधे काळ्याबाजारात अठरा हजार रुपयांना एक याप्रमाणे विक्री करत असल्याची माहिती समोर आली. दरम्यान, अटक केलेला योगीराज वाघमारे हा सावर्डे (ता. हातकणंगले) येथील बीएएमएसच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे, तर पराग पाटील हा एका मेडीकलमध्ये सेल्समन म्हणून नोकरीस आहेत. दरम्यान आणखीन एकाचे नाव निष्पन्न झाले असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.