आवाज वाढव डीजे.. .. तुला जेलची शपथ ! लगाव बत्ती इकडं धूर.. तिकडं जाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 23:15 IST2025-08-31T23:14:45+5:302025-08-31T23:15:12+5:30

विसर्जनात ‘डीजे’चा बास किती ठेवायचा, याचा अंदाज आगमन सोहळ्यावेळीच हुशार कार्यकर्ते पद्धतशीरपणे घेऊ लागलेले. पहिल्या दिवशी ‘खाकी’ गप्प बसली की शेवटच्या दिवशी ‘आवाज’ वाढवायचाच, हे ठरवू लागलेले.

Turn up the volume DJ I swear you'll go to jail! Light the lamp, smoke here burn there | आवाज वाढव डीजे.. .. तुला जेलची शपथ ! लगाव बत्ती इकडं धूर.. तिकडं जाळ

आवाज वाढव डीजे.. .. तुला जेलची शपथ ! लगाव बत्ती इकडं धूर.. तिकडं जाळ

- सचिन जवळकोटे कार्यकारी संपादक, कोल्हापूर लोकमत

विसर्जनात ‘डीजे’चा बास किती ठेवायचा, याचा अंदाज आगमन सोहळ्यावेळीच हुशार कार्यकर्ते पद्धतशीरपणे घेऊ लागलेले. पहिल्या दिवशी ‘खाकी’ गप्प बसली की शेवटच्या दिवशी ‘आवाज’ वाढवायचाच, हे ठरवू लागलेले. पूर्वीच्या काळी रात्री दहानंतर शिट्ट्या वाजल्या की ‘साउंड सिस्टम पॅकअप’ व्हायची. मात्र, यंदा रात्री साडेबारा-एकनंतरही ‘राजारामपुरी’सह कैक ठिकाणी बासऽऽ करा सांगूनही ‘बास’ सिस्टम बंद होईना म्हटल्यावर अनेक अधिकाऱ्यांनी चक्क कानांत बोळे घातलेले. कान झाकून घेतलेले. कदाचित शेजारचा फोटो विचलित करू शकणार नाही, कारण आपली मनं मुर्दाड झालेली. लगाव बत्ती..

▪️उत्सवात पारंपरिक वाद्ये वाजवावीत का डीजेचा धुमाकूळ घालावा,’ हा नेहमीचा विषय आज आपण हाताळत नाही. तरुणाईच्या उत्साहाला कुणीच कायमस्वरूपी बांध घालू शकत नाही, हे त्रिकालाबाधित सत्य सर्वांनीच स्वीकारलेलं. मात्र यंदाच्या वर्षीच हा प्रकार आकस्मिकपणे कैकपटीनं का वाढला, याचा शोध घेणं नक्कीच गरजेचं ठरलेलं. 
▪️यंदाचा उत्सव तब्बल चौदा-पंधरा दिवसांपेक्षाही अधिक मोठा होत गेलेला, ही धक्काश्चर्याची बाब ठरलेली.
पूर्वी ‘चतुर्थीला प्रतिष्ठापना’ अन् ‘चतुर्दशीला विसर्जन’ ही पद्धत ठरलेली; परंतु यंदा ‘आगमन सोहळा’ नावाखाली भाद्रपद महिना सुरू होण्यापूर्वीच मिरवणुका निघू लागलेल्या. मूर्तिकारांकडून गणेशमूर्ती  आणण्याच्या निमित्तानं श्रावणातच रस्ते पॅक होऊ लागलेले. पूर्वी एखादंच मोठं मंडळ अशी मिरवणूक काढायचं.  यंदा मात्र गल्लीबोळातही याचं पेव फुटलेलं. रोजच कुठल्या ना कुठल्या रस्त्यावरच्या गर्दीत ॲम्ब्युलन्स अडकू लागलेली. चिमुकल्या लेकरांची शाळा बुडू लागलेली. सलग सात-आठ दिवस आगमन सोहळे रंगू लागलेले. 

▪️यानंतर प्रतिष्ठापनेदिवशीही पुन्हा ‘डीजे’चा आवाजच टिपेला पोहोचू लागलेला. हे कमी पडलं की काय म्हणून मोठ्या मंडळांच्या गर्दीत आपल्याकडे कुणाचं लक्ष जाणार नाही, म्हणून दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीही मंडपातील मूर्तीची पुन्हा नव्यानं मिरवणूक काढण्याचं भलतंच फॅड काही छोट्या मंडळांकडून सुरू झालेलं. त्यानंतर दीड, पाच, सात, नऊ अन् अकरा दिवसांच्या गणपतीचा विसर्जन सोहळा आटोपेपर्यंत शेवटच्या दिवशीची धांदल सुरू झालेली. 
यंदा तर म्हणे मिरवणूक मार्गावर व्यवस्थित वेळ अन् जागा मिळणार नाही म्हणून ‘चतुर्दशी’नंतर विसर्जन करण्यासाठी काही मंडळांनी हालचाली सुरू केलेल्या. म्हणजे बघा.. गणपती येणार श्रावण अमावास्येला. जाणार मात्र भाद्रपद पौर्णिमेला. मोरयाऽऽ

▪️उत्सवातील आवाजाविरोधातला कायदा पूर्वीपेक्षा स्ट्राँग बनलेला. धांगडधिंग्याच्या विरोधात सर्वसामान्य जनतेचाही दबाव वाढत चाललेला. मात्र, परवा सर्वांच्या नाकावर टिच्चून ‘डीजे’चा आवाज शिगेला पोहोचलेला. जणू इरेला पेटलेला. हतबल ‘खाकी’समक्ष कैक बीभत्स गाणी भलतीच चेकाळलेली. हे कमी पडलं की काय म्हणून ‘रात्री एकपर्यंत साऊंड वाजवला पठ्ठ्यानंऽऽ’ या नावानं फिरलेली रिल्स लाखो तरुणांनी लाईक केलेली. झपाट्यानं बदलणारं हे समाजमन भलतंच हादरवून टाकणारं. सारंच विस्मयचकित. धक्कादायक. लगाव बत्ती..

▪️पुढच्या काही महिन्यांत ‘मेंबर’ मंडळींच्या निवडणुका. ‘आजी-माजी-भावी’ साऱ्याच ‘मेंबरां’ना मोठमोठाली स्वप्नं पडू लागलेली. त्यातूनच त्यांचा खिसा मोकळा होऊ लागलेला. अठरा वर्षांपुढील प्रत्येक तरुण मतदार डोळ्यांसमोर ठेवून बहुतांश मंडळांना घसघशीत देणगी प्राप्त झालेली. त्यामुळं यंदा मिसरूड न फुटलेल्या इवल्याशा लेकरांनीही ‘दोन-तीन पेट्यां’च्या पावतीतून ‘धुमधडाम सिस्टीम’ आरामात छोट्या गल्लीत आणलेली. कैक मंडळांकडून ‘भाऊ-दादा’ पद्धतशीरपणे प्रमोट होऊ लागलेले. गावातल्याच स्टुडिओत हवी तशी गाणी रेकॉर्ड करून मिळाल्यानं ‘एकमेकांचा बाप’ काढणाऱ्या विचित्र पॉप म्युझिकनं या लेकरांच्या ‘पिताश्रीं’नाही मान घाली घालायला लावलेली. 

▪️मुळात कार्यकर्तेही खूप हुशार. ‘खाकी’नं भलेही दुसऱ्या दिवशी केसेस टाकल्या, तरी नंतर प्रकरण कोर्टात जातं. हात जोडून अन् गयावया करत माफी मागितली की ‘दोन हजारांच्या दंडा’वर होते सुटका, हे अनुभवातून लक्षात येऊ लागलेलं. त्यामुळे ‘ध्वनिप्रदूषण’च्या खटल्यात तब्बल पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते, हे अनेकांना ठाऊकच नसलेलं. म्हणूनच ‘आवाज वाढव डीजे.. तुला जेलची शपथ’ म्हणत ‘खाकी’च्या साक्षीनं किळसवाण्या डान्सच्या स्टेप्स वाढतच चाललेल्या. लगाव बत्ती..

▪️यंदा ‘सातार’च्या हजारो आजी-आजोबांनी या ‘किंकाळवाणी’ला कडाडून विरोध केलेला. ‘मिरजे’त मात्र लोकप्रतिनिधींनीच कार्यकर्त्यांना उचकवून ठेवलेलं. सर्वसामान्य ‘कोल्हापूरकर’ अद्यापपावेतो हा सारा प्रकार अत्यंत संयमानं सहन करू लागलेले. ‘चळवळ्यांचं शहर’ एवढं शांत का बसलं, याचं जगालाही आश्चर्य वाटू लागलेलं. ‘सोलापूर’ जिल्ह्यात मात्र ‘कलेक्टर’नी आजच ‘डीजेबंदी’ची ऑर्डर काढलेली. जे लगतच्या जिल्ह्यात होऊ शकतं, ते आपल्याकडं का नाही? लगाव बत्ती..

▪️‘कोल्हापुरा’त मात्र ‘काचा फोडतो’ म्हणणाऱ्याचा ‘आवाज’ डायरेक्ट कमी करण्याची किमया ‘खाकी’नं करून दाखवलेली. ‘आवाज सोडतो.. काचा फोडतो,’चा बॅनर रुबाबात  झळकवणारा पठ्ठ्या नंतर गपगुमानं ‘डीजे किती वाईटऽऽ’ हे खालच्या आवाजात सांगू लागलेला. लगाव बत्ती..

▪️उन्मादापायी यांची लेकरं उघड्यावर पडली, त्याचं काय ? काही वर्षांपूर्वी ‘डीजे’च्या दणदणाटामुळे ‘साताऱ्या’तील ‘राजपथा’वर जुन्या इमारतीची भिंत कोसळून ‘बोलेमामा वडापाव’वाल्याचा हकनाक बळी गेलेला. ‘कोल्हापुरा’तही ‘महाद्वार’जवळ अशीच इमारत कोसळून कैक जखमी झालेले. परवा ‘मिरजेत’ही मिरवणुकीचं मोबाइलवर शूटिंग करताना ‘बाबासाहेब’ नामक कार्यकर्त्याला जिवाला मुकावं लागलेलं. त्याची तीन लेकरं निराधार झालेली. खरंतर या प्रकरणातून ‘खाकी’नं स्वत:हून पुढाकार घेत केस ठोकायला हवी होती. मात्र, बिच्चारे अधिकारी अद्याप फिर्यादीची वाट पाहत बसलेले. म्हणूनच उत्साहाचा उन्माद थेट ‘सैराटगिरी’च्या थाटात विचित्रपणे सळसळू लागलेला. लगाव बत्ती..💣💥

Web Title: Turn up the volume DJ I swear you'll go to jail! Light the lamp, smoke here burn there

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.