टायर फुटल्याने भुईबावडा घाटात ट्रक उलटला, चालक-क्लिनर जखमी; वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 16:49 IST2022-03-07T16:44:01+5:302022-03-07T16:49:03+5:30
दरम्यान, घाट मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे

टायर फुटल्याने भुईबावडा घाटात ट्रक उलटला, चालक-क्लिनर जखमी; वाहतूक ठप्प
गगनबावडा : टायर फुटल्याने मैद्याची पोती घेऊन जाणारा ट्रक भुईबावडा घाटात उलटला. या अपघातात चालक व क्लिनर किरकोळ जखमी झाले आहेत. चालक सचिन दशरथ शिरसाट व क्लिनर विकास अशोक रंगचोरे अशी या दोघा जखमींची नावे आहेत. दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. दरम्यान, घाट मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
याबाबत माहिती अशी की, चालक सचिन शिरसाट हे मैद्याने भरलेला ट्रक ( नं.एमएच-१५-ईजी-७८३९) सिन्नरहून गोव्याकडे घेऊन जात होते. त्यांच्यासोबत क्लिनर विकास रंगचोरे होते. भुईबावाडा घाटात ट्रक आला असता ट्रकचा पुढील डाव्या बाजूचा टायर अचानक फुटला आणि ट्रक रस्त्यातच पलटी झाला.
या अपघातात मैद्याच्या पिशव्या खोल दरीत गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. तसेच ट्रकचेही मोठे नुकसान झाले. या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. अपघाताची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पो. ना. आर.व्ही. नारणवर, पोलीस कॉन्स्टेबल संदीप राठोड, जायभाय हे घटनास्थळी दाखल झाले. टायर फुटून हा अपघात झाल्याची माहिती यावेळी पोलिसांनी दिली.