साठीतल्या तरुणांची तिलारी सहल; त्यांच्यातली उमेद तरुणाईलाही लाजवणारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 18:15 IST2019-12-05T18:13:02+5:302019-12-05T18:15:18+5:30
कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपुरकर यांचा ‘मित्रांचा वेड्यांचा कट्टा’ नावाचा ग्रुप आहे, ते दर शनिवारी सकाळी सजीव नर्सरीमध्ये जमतात. वर्षातून एक-दोनदा ते सहलीचे आयोजन करतात.

कोल्हापुरातील ज्येष्ठ नागरिकांनी तिलारी येथील सहलीचा आनंद लुटला.
कोल्हापूर : त्या तरुणांचे वय अवघे ६५ वर्षे काहीजण तर ८० वर्षे पार केलेले. काहीजणांची बायपास झालेली, तर काहीजणांना वयोमानानुसार आरोग्याच्या तक्रारी; पण त्यांच्यातली उमेद तरुणाईलाही लाजवणारी. तिलारीसारख्या भागात चढ-उतारांची वळणे पार करत त्यांनी तिलारी फोर वे डॅम येथे दोन दिवस सहलीचा आनंद लुटला.
कोल्हापूरचे टोक असलेल्या चंदगडपासून जवळच असलेल्या तिलारी धरणाचा परिसर म्हणजे निसर्गाची मुक्त उधळण. येथील पाणी गरजेनुसार छोट्या तलावातसोडले जाते, तेथील पॉवर हाऊसमधून गोव्यासाठीची वीजनिर्मिती केली जाते. याच भागात पारगड किल्ला आहे. ट्रेकिंगसाठी उत्तम ठिकाण, शिवाय बाग, तलाव आहेत. दऱ्याखोऱ्यांचा भाग, घाट, धोक्याचा लहान-मोठ्या वळणांचा रस्ता. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्याच्या सीमारेषेवर असलेल्या या परिसरात फिरण्यासाठी हौसेबरोबरच शारीरिक ताकदही हवी.
कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपुरकर यांचा ‘मित्रांचा वेड्यांचा कट्टा’ नावाचा ग्रुप आहे, ते दर शनिवारी सकाळी सजीव नर्सरीमध्ये जमतात. वर्षातून एक-दोनदा ते सहलीचे आयोजन करतात. पर्यावरणासह छायाचित्रण, जंगल भ्रमंती असे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. यंदा मात्र त्यांनी थोड्या आव्हानात्मक ठिकाणी जायचं ठरवलं आणि साठीपासून ते ८५ पर्यंतचे वय पार केलेले हे तरुण दोन दिवस तिलारीच्या सहलीला गेले. शिपूरकर यांची तर बायपास झालेली; पण या सगळ्याच ज्येष्ठांनी पायी फिरत ही सहल अनुभवली, निसर्गाच्या आविष्काराचा आनंद लुटला.
या सहलीत सुरेश शिपूरकर, दशरथ पारेकर, डॉ. मोहन धर्माधिकारी, सदूभाऊ डोंगळे, एन. एस. पाटील, सुभाष पुरोहीत, विश्वास पाटील, माजी वनसंरक्षक विनायक मुळे यांचा सहभाग घेतला.