Kolhapur News: सैन्य भरती प्रक्रियेसाठी प्रवास २० तास, प्रतीक्षा करावी लागते २४ तास
By उद्धव गोडसे | Updated: November 18, 2025 17:44 IST2025-11-18T17:41:14+5:302025-11-18T17:44:16+5:30
टीए बटालियनची भरती : हुडहुडी भरवणाऱ्या थंडीत भरती प्रक्रियेची प्रतीक्षा

Kolhapur News: सैन्य भरती प्रक्रियेसाठी प्रवास २० तास, प्रतीक्षा करावी लागते २४ तास
उद्धव गोडसे
कोल्हापूर : चार-पाच वर्षे नियमित सराव करून सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रवास प्रचंड खडतर आणि अनिश्चिततेचा आहे. तरीही डोळ्यांत स्वप्ने घेऊन राज्याच्या काेनाकोपऱ्यातून येणारी तरुणाई अंगावर सैन्य दलाची वर्दी चढविण्यासाठी जीवाचे रान करीत आहे. टीए बटालियनच्या भरतीसाठी गेल्या चार दिवसांपासून शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर अक्षरश: झुंबड उडाली असून, अनेक संकटांचा सामना करीत तरुणाई स्वत:ला सिद्ध करीत आहे.
जळगाव जिल्ह्यातील जवळा बाजार गावचा विशाल बेदरे हा गेल्या चार वर्षांपासून सैन्य भरतीची तयारी करतोय. यापूर्वी त्याने एकदा अग्निवीर आणि एकदा टीए बटालियनच्या भरतीसाठी प्रयत्न केला. पोलिस दल किंवा सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न बाळगून तो सातत्याने सराव करतोय. मालेगाव (जि. नाशिक) येथील एका अकॅडमीत दीड वर्ष सराव केल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून तो जळगावमधील एका अकॅडमीत घाम गाळत आहे. त्याचे आई-वडील शेती करतात. मोठा भाऊ खासगी नोकरी करतो. येणाऱ्या वर्षभरात यश मिळवायचेच असा त्याचा निर्धार आहे.
रेल्वेने २० तासांचा प्रवास करून सोमवारी सकाळी तो कोल्हापुरात पोहोचला. आता हुडहुडी भरवणाऱ्या थंडीत मंगळवारी पहाटेपर्यंत तो भरती प्रक्रियेची प्रतीक्षा करणार. त्यानंतर सलग १० तासांच्या भरती प्रक्रियेला तो सामोरे जाईल.
अहिल्यानगरच्या विश्रामपूरमधून आलेल्या करण सरदारची करुण कहाणी डोळ्यांत पाणी आणणारी आहे. अपघातात वडिलांचा पाय गमावला. आई मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. लहान भाऊ दहावीचे शिक्षण घेतोय. बारावी झालेल्या करणने सैन्य भरतीसाठी जीवाचे रान केले आहे. स्वत:च्या पायावर उभे राहून कुटुंबाला आधार देण्याचा हाच एक मार्ग त्याला दिसतो. त्यामुळे काहीही करून भरती होण्याचे स्वप्न पूर्ण करणारच, असा त्याचा दुर्दम्य आत्मविश्वास आहे. नातेवाइकांकडून हातउसने पैसे घेऊन तो भरतीसाठी आला आहे. विशाल आणि करण ही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. भरतीसाठी येणाऱ्या बहुतांश तरुणांची अशीच संघर्षमय पार्श्वभूमी आहे.
मुलांसाठी वडिलांचा संघर्ष
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी अशोक शिर्के हे त्यांच्या दोन मुलांना घेऊन भरतीसाठी आले आहेत. हातावरचे पोट असल्यामुळे मुलांना सैन्यात भरती करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. कोल्हापुरातील भरतीत या धडपडीला यश येईल, असा त्यांचा आशावाद आहे. दोन्ही मुलांवरही भरतीचा प्रचंड ताण स्पष्ट दिसत होता.
एका भरतीसाठी दोन हजारांचा खर्च
भरतीसाठी येणारे बहुतांश तरुण गरीब, कष्टकरी कुटुंबातील असतात. काही जण अकॅडमीत तयारी करतात. यासाठी दरमहा पाच ते सात हजारांचा खर्च येतो. एका भरतीला उतरण्यासाठी प्रवास, जेवण, चहा-पाणी, कागदपत्रांच्या झेरॉक्स असा एकूण खर्च किमान दीड ते दोन हजार रुपयांवर जातो. पैशांची व्यवस्था करण्यासाठी त्यांना अनेकदा मित्र, नातेवाइकांकडे हात पसरावे लागतात.