कोल्हापुरात रेल्वे मालगाडीचा डबा उलटला, सहा जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 14:53 IST2021-12-06T14:04:19+5:302021-12-06T14:53:14+5:30
रेल्वे स्थानकात पार्किंग यार्डमध्ये एका रेल्वे डब्याला आग लागल्याच्या घटनेला काही तास उलटले नसतानाच रेल्वे अपघाताची दुसरी घटना घडली आहे. मार्केट यार्ड परिसरात रेल्वे मालगाडीचा डबा उलटल्याची घटना घडली आहे

कोल्हापुरात रेल्वे मालगाडीचा डबा उलटला, सहा जण जखमी
कोल्हापूर : रेल्वे स्थानकात रेल्वे डब्याला आग लागल्याची घटना ताजी असतानाच काही तासातच मार्केटयार्ड मधील रेल्वे गुड्समध्ये मालगाडीतील सिमेंट पोती उतरताना एक बोगी उलटल्याची घटना घडली. यात सहा हमाल जखमी झाले. त्यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे. सोमवारी दुपारी साडे बाराच्या दरम्यान ही दुर्घटना घडली.
सुरेश पांडुरंग सांडूगडे (वय-41), सिराज शब्बीर आदालखान (30), राजू पंडित गेंड (28), सनीउल्ला नानीउल्ला चमनशेख (41), सादिक शब्बी शेख (45) मुजाहिद्दीन इम्तिहाज मुजावर (45, सर्व रा. विक्रमनगर, कोल्हापूर) अशी जखमींची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कोल्हापुरात मार्केट यार्ड मधील गुड्स मार्केट मध्ये रविवारी रात्री रेल्वे लाईन नंबर तीनवर सिमेंटची पोती भरून आलेली मालगाडी थांबली होती. सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास या रेल्वे मालवाहतूक बोगीतील सिमेंटची पोती उतरण्याचे काम सुरू होते. बोगीतील 1397 पैकी फक्त साडेतीनशे सिमेंट उतरणे बाकी असताना बोगी उलट दिशेला उलटली. यावेळी बोगीतील सहा हमाल या पोत्याखाली अडकले.
घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. इतर हमालांनी त्याखाली दबलेल्या हमालांना बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर शहर पोलीस उपाध्यक्ष मंगेश चव्हाण, करवीर पोलीस उपाधीक्षक संकेत गोसावी, शाहुपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश गवळी यांच्यासह लोहमार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी काळे, निरीक्षक आर यादव यांच्यासह पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती.