हिमाचल प्रदेशात हिमवृष्टीत अडकलेले कोल्हापुरातील पर्यटक सुखरूप परतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 15:51 IST2026-01-27T15:50:15+5:302026-01-27T15:51:12+5:30
३६ तासांनंतर वाहतूक सुरळीत

हिमाचल प्रदेशात हिमवृष्टीत अडकलेले कोल्हापुरातील पर्यटक सुखरूप परतले
म्हाकवे : हिमाचल प्रदेशात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार हिमवृष्टी सुरू आहे. या भागात पर्यटनासाठी गेलेल्यांना हिमवर्षावाचा ‘याची देही याची डोळा’ अनुभव घेता आला. मात्र, जोरदार हिमवृष्टीमुळे मुख्य रस्त्यावर बर्फाचे ढीग जमा झाले होते. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने वाहतूक बंद केली होती. त्यामुळे पर्यटकांची घालमेल सुरू होती.
तब्बल ३६ तासांनंतर वाहतूक सुरळीत झाल्याने शेकडो पर्यटकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. यामध्ये कागल तालुक्यातील दहा जणांचा समावेश होता. दरम्यान, त्यांना काश्मीरमधील पर्यटनस्थळे अर्ध्यावरच सोडून परतावे लागले. साताप्पा चव्हाण (बेनिक्रे), प्रभाकर खोत (आणूर), विनायक पाटील (बानगे) या छायाचित्रकारांसह डी. आर. सांडूगडे, शंकर इंगवले, सागर पाटील, संतराम पाटील, नंदू बोंगर्डे, करीम पटेल, राजू खोत हे सुखरूप परतले आहेत.