Kolhapur Politics: अडीचशे किलोमीटर क्षेत्रात प्रचार करताना उमेदवारांची दमछाक

By राजाराम लोंढे | Published: April 8, 2024 11:55 AM2024-04-08T11:55:53+5:302024-04-08T11:56:48+5:30

‘कोल्हापूर’, ‘हातकणंगले’मध्ये २३०० गावांचा समावेश : वाढत्या पाऱ्याने उमेदवारांसह प्रचारक घामाघूम

Tiredness of candidates while campaigning in 250 km area in kolhapur district | Kolhapur Politics: अडीचशे किलोमीटर क्षेत्रात प्रचार करताना उमेदवारांची दमछाक

Kolhapur Politics: अडीचशे किलोमीटर क्षेत्रात प्रचार करताना उमेदवारांची दमछाक

राजाराम लोंढे 

कोल्हापूर : चंदगडपासून गगनबावड्यापर्यंत आणि शियेपासून भुदरगडपर्यंत पसरलेला ‘कोल्हापूर’लोकसभा मतदारसंघ आणि चांदोलीपासून वाळव्याच्या जुनेखेड तर, खिद्रापूरपासून शाहूवाडीच्या उदगिरीपर्यंत व्यापलेल्या ‘हातकणंगले’मतदारसंघातील गावापर्यंत प्रचारासाठी जाताना उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांची दमछाक उडत आहे. प्रत्येक मतदारसंघात सुमारे २५० किलो मीटरच्या अंतरात १२०० गावांत पाेहचणे तेही कडक उन्हाळ्यात कठीण होणार आहे.

चंदगडच्या ‘कोलिक’ पासून गगनबावडा, करवीरमधील शिये ते राधानगरीतील ओलवणपर्यंत आणि भुदरगड तालुक्यातील तांब्याचीवाडीपर्यंत ‘कोल्हापूर’ लोकसभा मतदारसंघ विखुरला आहे. शिराेळमधील खिद्रापूर ते शाहूवाडीतील उदगिरी, शिराळ्यातील चांदोली ते वाळवा तालुक्यातील जुनेखेडपर्यंत पसरलेला ‘हातकणंगले’ मतदारसंघ हा सुमारे २५० किलो मीटर आहे. या क्षेत्रात प्रचार करताना उमेदवारांची दमछाक होत आहे. येथील मतदान ७ मे रोजी आहे, तोपर्यंत उन्हाचा तडाका वाढणार आहे. अशा वातावरणात बाराशे गावांपर्यंत पोहचण्यासाठी कसरतच करावी लागणार आहे.

‘कोल्हापूर’ मतदारसंघात जवळपास ४ लाख ६४ हजार हे कोल्हापूर शहरातील तर ‘हातकणंगले’ मतदारसंघात ३ लाख ५० हजार हे ‘इचलकरंजी’ व ‘इस्लामपूर’ शहरातील मतदार आहेत. उर्वरित १४ ते १५ लाख मतदार हे ग्रामीण भागात असल्याने उमेदवार पुरते घामाघूम होणार आहेत.

सूर्य आग ओकताना प्रचार करायचा कसा?

मतदानासाठी अजून एक महिना आहे, आताच जिल्ह्याचा पारा ४० डिग्रीपर्यंत पोहचला आहे. आगामी काळात तर सूर्य आग ओकणार असल्याने प्रचारासाठी घराबाहेर पडणे मुश्कील होणार आहे. तरुणांची घालमेल होते मग, वयाेवृद्ध उमेदवार व त्यांच्या प्रचारक मतदारांपर्यंत पोहचणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

अपक्षांचा मतदारांना दुरूनच नमस्कार

पक्षाच्या उमेदवारांची जेवढी यंत्रणा असते, तेवढी अपक्ष किंवा लहान पक्षांच्या उमेदवारांची नसते. त्यामुळे या उमेदवारांना छोट्या छोट्या गावात, वाड्यावस्त्यांवर पोहचता येत नसल्याने त्यांना मतदारांना दुरूनच नमस्कार करावा लागणार आहे.

असे पसरले मतदारसंघ :

कोल्हापूर : चंदगडचे कोलिक, तिलारी ते गगनबावडा. करवीरमधील शिये ते राधानगरीचे शेवटचे टोक ओलवण. अंबोलीच्या शेजारील किटवडे ते पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव. गडहिंग्लजमधील काटवी कट्टी, तेरणी ते भुदरगड तालुक्यातील तांब्याची वाडी.

हातकणंगले : शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर ते शाहूवाडीतील उदगिरी. हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ ते शिराळा तालुक्यातील चांदोली. वाळवा तालुक्यातील जुनेखेड ते हातकणंगले तालुक्यातील अंबप-मनपाडळे.

दृष्टिक्षेपात मतदान केंद्रे व मतदान-

मतदारसंघ - केंद्रे  - मतदान
कोल्हापूर - २१५६ - १९ लाख २१ हजार ९३१
हातकणंगले - १८६० - १८ लाख १ हजार २०३

Web Title: Tiredness of candidates while campaigning in 250 km area in kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.