कोल्हापूर : सहकारी मित्राकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आकाश शांताराम बोराडे (वय २३, रा. आर. के. नगर, कोल्हापूर, मुळ कातराबाद, ता.परांडा, जि. धाराशिव) याने राहत्या घरात गुरुवारी रात्री फॅनच्या हुकाला नायलॉनच्या दोरीने गळफासाने आत्महत्या केली. पोलिसांनी त्याच्या खोलीतून चार पानी चिठ्ठी ताब्यात घेतली आहे.
पालकांचा जबाब घेतल्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती करवीर पोलिसांनी दिली. या घटनेची नोंद करवीर पोलिसांत झाली. मित्र त्याला नेमका कशाचा त्रास देत होता याचा पोलिस शोध घेत आहेत.
पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोराडे कुटुंबीय आर. के. नगर सोसायटी क्रमांक सहा मध्ये गेल्या तीन वर्षापासून भाड्याने राहतात. आकाश हा आई- वडिलांसोबत राहत होता. त्याने केआयटीमध्ये एमबीएच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिली. कॅम्पस इंटरव्ह्यू मधून त्याची एका मॉलमध्ये विभाग व्यवस्थापक म्हणून निवडही झाली. मात्र तो काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होता.
त्याबाबत नात्यातील काही मंडळींनी त्याच्याकडे विचारपूस केली. त्यावेळी त्याच्या एका मित्राकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळला असल्याचे त्याने सांगितले होते. नात्यातील काही मंडळींच्याही निदर्शनास हा प्रकार आला होता. मात्र कालांतराने त्याच्या मित्राचा त्रास वाढतच राहिल्याने गुरूवारी रात्री उशिरा गळफास घेऊन आत्महत्या केली.
गुरुवारी रात्री त्याची आई वनिता या बेडरुमध्ये बोलाविण्यास गेल्या. त्यावेळी हाक मारुनही त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यावेळी घरमालकांना झालेला हा प्रकार सांगितला. त्यांनी बेडरुमचा दरवाजा उघडला असता प्लास्टिकच्या खुर्चीवर ॲल्युमिनियमचा डबा ठेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी ही माहिती करवीर पोलिसांना दिल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले.तरूणाने आत्महत्या करण्यापूर्वी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली चार पानी चिठ्ठी ताब्यात घेतली. शवविच्छेदनानंतर मृतदेहाचा ताबा घेऊन नातेवाईक धाराशिव जिल्ह्याकडे रवाना झाले. आज (शनिवारी) सायंकाळपर्यंत नातेवाईक कोल्हापूरला परततील. त्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
परिसरात हळहळकेवळ मित्राकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून तरुणाने जीवन संपविले. त्यामुळे आर. के. नगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आकाश हा मनमिळाऊ स्वभावाचा होता. त्याने अचानक उचललेल्या पावलामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. आई आणि वडिलांना धक्का बसल्याने ते जबाब देण्यासाठी करवीर पोलिसांत आले नाहीत. त्यांच्या घरमालकांच्या भावाने हा जबाब पोलिसांना दिला.