रिक्त पदातील अदलाबदलीप्रकरणी तिघे कारवाईच्या फेऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 11:00 IST2019-06-13T10:56:06+5:302019-06-13T11:00:52+5:30
शिक्षक बदली अंतर्गत सुरू असलेल्या समानीकरणाच्या प्रक्रियेत शिरोळ तालुक्यातील १२ शाळांमधील रिक्त पदामंध्ये अदलाबदली करणे, शिरोळ पंचायत समितीतील तिघांच्या अंगलट आले आहे.

रिक्त पदातील अदलाबदलीप्रकरणी तिघे कारवाईच्या फेऱ्यात
कोल्हापूर : शिक्षक बदली अंतर्गत सुरू असलेल्या समानीकरणाच्या प्रक्रियेत शिरोळ तालुक्यातील १२ शाळांमधील रिक्त पदामंध्ये अदलाबदली करणे, शिरोळ पंचायत समितीतील तिघांच्या अंगलट आले आहे.
या घातलेल्या घोळाबद्दल प्रथम दर्शनी दोषी आढळणाऱ्या गटशिक्षणाधिकाऱ्यांसह विस्तार अधिकारी व कनिष्ठ साहाय्यकांना कारणे दाखवा नोटीस प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सीईओंच्या सहीनिशी बजावली. या प्रकरणामुळे एकूणच रिक्त जागा दाखविण्याच्या प्रक्रियेवर शंका घेतल्या जात आहेत.
बदली पोर्टल अंतर्गत जिल्हा परिषदेतीलशिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मॅपिंग पूर्ण झाल्यानंतर समानीकरण, पती-पत्नी एकत्रिकरणासह माहिती संकलित करून तयार झालेल्या रिक्त जागांची माहिती या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम शनिवारी रात्रीपर्यंत जिल्हा परिषदेत सुरू होते.
रविवारी मध्यरात्री हे बदली पोर्टल खुले करण्यात आले, दरम्यान हे करत असताना हे काम करणाऱ्या शिक्षक व काही कर्मचाऱ्यांना शिरोळमधील १२ शाळांमधील रिक्त जागांची माहिती बदलली जात असल्याचा संशय आला. आकडे वारंवार बदलत असल्याने याची चौकशी केली असता, गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या लॉगीनवरून हा प्रकार सुरू असल्याचे स्पष्ट झाले.
हा प्रकार गंभीर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तातडीने सीईओ व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या कानावर हा प्रकार घालण्यात आला. हा प्रकार गंभीर असल्याने शिरोळचे गटशिक्षणाधिकारी आर. डी. काळणे, विस्तार अधिकारी डी. एल. कामत व कनिष्ठ साहाय्यक ए. व्ही. अस्वले यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याचा निर्णय झाला.
प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी तशी टिप्पणी तयार करून सीईओ अमन मित्तल यांच्याकडे पाठविल्यानंतर त्यांनीही तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार या तिघा अधिकाऱ्यांना तातडीने खुलासा देण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणानंतर शिरोळ तालुक्यातील शिक्षण विभागात खळबळ उडाली असून, कारभारावर शंका घेतल्या जात आहेत. रिक्त पदांत घोळ घातल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर तालुक्यातीलच काही जिल्हा परिषदेच्या कारभारी सदस्यांनी यावर पडदा टाकण्याच्या हालचाली सुरूकेल्या आहेत. याची चर्चा दिवसभर जिल्हा परिषदेत सुरू होती.